क्षयरूग्णांच्या मृत्यूसंख्येत घट
By Admin | Updated: March 24, 2017 01:34 IST2017-03-24T01:34:08+5:302017-03-24T01:34:08+5:30
जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या सतर्कतेने आणि क्षयबाधितांच्या नियमित उपचारांमुळे नव्याने ग्रस्त होणाऱ्या क्षयरुग्णांच्या संख्येत घट होत आहे.

क्षयरूग्णांच्या मृत्यूसंख्येत घट
देवानंद शहारे गोंदिया
जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या सतर्कतेने आणि क्षयबाधितांच्या नियमित उपचारांमुळे नव्याने ग्रस्त होणाऱ्या क्षयरुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तरीही जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ९०० क्षयरूग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७६८ क्षयरूग्ण नियमित औषधोपचाराने रोगमुक्त झाले. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी क्षयरूग्णांची मृत्यूसंख्या २३ ने कमी झाली. नियमित औषधोपचार व पर्यवेक्षकीय कामांमुळे जिल्ह्यात क्षयरूग्णांची मृत्यूसंख्याही घटत असल्याचे दिसून येते.
‘मायकोबॅक्टेरिम ट्युबरकुलासिस’ या जिवाणूपासून क्षयरोग होतो. हा रोग संसर्गजन्य असून थुंकणे, शिंकणे व खोकल्याद्वारे हवेमार्फत पसरतो. क्षयरोगाची लागण देशभरात प्रतिदिवशी एक लाख लोकांना होते. पाच हजार रूग्ण दरदिवशी क्षयरोगाचे बळी ठरतात. देशभरात दर तीन मिनिटाला दोन क्षयरूग्णांचा मृत्यू होतो. तसेच क्षयरूग्णाला एचआयव्ही-एड्स होण्याचे प्रमाण ५ टक्के असते तर एचआयव्ही-एड्स रूग्णाला क्षयरोग होण्याचे प्रमाण ९५ टक्के असते. मात्र नियमित औषधोपचार, सकस आहार व नियमित व्यायाम याद्वारे क्षयरूग्ण हमखास बरा होवू शकतो.
मागील चार वर्षांचा कालावधी पाहता, सन २०१३-१४ मध्ये जिल्ह्यात तीन लाख ६५ हजार ९६१ रूग्णांची तपासणी करण्यात आली. आठ हजार ४३५ थुंकी नमूणे गोळा करण्यात आले. यात ७४० थुंकी नमूणे सकारात्मक आढळले. तर थुंकी नमूणे सकारात्मक, नकारात्मक व फुफ्फुसेतर क्षयरूग्ण मिळून एकूण एक हजार २३० रूग्ण आढळले. नियमित औषधोपचाराने एक हजार ००१ क्षयरूग्ण बरे झाले, तर ९५ क्षयरूग्णांचा मृत्यू झाला होता. सन २०१४-१५ मध्ये पाच लाख ६५ हजार ७४० रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात ११ हजार ४८९ थुंकी नमूणे गोळा करण्यात आले. त्यात ७५५ नमूणे पॉझिटिव्ह आढळले. थुंकी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह व फुफ्फुसेतर मिळून एकूण रूग्णसंख्या एक हजार १७९ झाली. नियमित औषधोपचाराने एक हजार ०१८ रूग्ण बरे झाले, तर ७२ रूग्णांचा मृत्यू झाला.
सन २०१५-१६ मध्ये सहा लाख ३१ हजार ८४१ रूग्णांची तपासणी करण्यात आली. ११ हजार ६६४ थुंकी नमूणे गोळा झाले. त्यात ७९१ पॉझिटिव्ह आढळले. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह व फुफ्फुसेतर मिळून एक हजार २४८ क्षयरुग्ण आढळले. यात औषधोपचाराने एक हजार ०१८ रूग्ण बरे झाले व ९२ क्षयरूग्णांचा मृत्यू झाला. तर सन २०१६-१७ मध्ये चार लाख ७० हजार ६५२ रूग्णांची तपासणी करण्यात आली. नऊ हजार ८३० थुंकी नमूणे गोळा झाले. एकूण क्षयरूग्ण ९०० आढळले. नियमित औषधोपचाराने ७७८ क्षयरूग्ण बरे झाले, तर वर्षभरात ६९ क्षयरूग्णांचा मृत्यू झाला.
मागील चार वर्षांत एकूण चार हजार ५५७ क्षयरूग्ण आढळले. त्यापैकी नियमित औषधोपचाराने तीन हजार ७६० रूग्ण बरे झाले, तर ३२८ क्षयरूग्णांचा मृत्यू झाला. यात ८.७२ टक्के क्षयरूग्णांचा मृत्यू झाला. तर बरे होण्याची टक्केवारी ८२.५१ आहे.
१० वर्षांत एमडीआर क्षयरोगाचे २१ बळी
नियमित औषधोपचाराला दाद न देण्याऱ्या क्षयरूग्णांची एमडीआर/एक्सडीआर तपासणी केली जाते. जिल्ह्यात उपचाराखाली असलेल्या तब्बल एक हजार ८८१ क्षयरूग्णांची एमडीआर/एक्सडीआर तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०१ रूग्णांवर एमडीआर/एक्सडीआरचा (कॅटेगरी ४ व ५) औषधोपचार सुरू करण्यात आला. त्यामुळे २४ रूग्ण बरे झाले. पाच रूग्णांनी औषधोपचार पूर्ण केला. सन २००७ ते २०१७ दरम्यान तर २१ रूग्णांचा मृत्यू झाला. त्यात १५ रूग्णांनी नियमित औषधोपचार पूर्ण केला नाही. तर सहा रूग्णांवर औषधीने काम केले नाही. एमडीआरच्या दोन रूग्णांवर एक्सडीआरचा उपचार सुरू करण्यात आला. तीन एमडीआर रूग्णांना उपचारासाठी जिल्ह्याबाहेर पाठविण्यात आले. तर पाच एमडीआर रूग्ण दुसऱ्या जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात उपचारासाठी आले.
उपचारापूर्वीच दोन एक्सडीआर क्षयरूग्णांचा मृत्यू
सन २००७ ते २०१७ च्या फेब्रुवारीपर्यंत एक्सडीआर टीबीचे सहा क्षयरूग्ण आढळले. उपचारापूर्वीच त्यातील दोन रूग्ण दगावले. तर चार एक्सडीआर रूग्णांवर कॅटे-५ चा औषधोपचार सुरू करण्यात आला. त्यापैकी एक रूग्ण पूर्णत: बरा झाला, तर इतर तीन रूग्ण अद्यापही औषधोपचाराखाली आहेत.