Due to the closure of the bus ferry, the schoolchildren are deprived | बस फेरी बंद झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचे बेहाल

बस फेरी बंद झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचे बेहाल

ठळक मुद्देघरी पोहचण्यास होतो उशीर : दखल घेणार कोण, पालकांना लागली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : येथे शैक्षणिक महाविद्यालय असून शिक्षण घेण्यासाठी खेड्यापाड्यातुन अनेक विद्यार्थी एसटी बसने ये जा करतात. मात्र देवरी मार्गावरील सायंकाळच्या वेळेतील बस फेरी बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. बस अभावी विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यासाठी ८ वाजत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे तरी कसे असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे.
सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी बस सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. महामंडळाच्या बसमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्याची सोय झाली. मात्र आता याच विभागाच्या लेटलतीफ धोरणाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. आमगाव येथे विविध शाळा आणि महाविद्यालय असल्याने २५ ते ३० कि.मी.अंतरावरील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी बसने ये-जा करतात. मात्र मागील काही दिवसांपासून देवरी मार्गावरील सायंकाळची बस फेरी आगाराने बंद केली. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सालेकसा, डोमाटोला, कालीसरार, हरदोली, पाऊलदौना हा परिसर जंगल व्याप्त आहे. या परिसरातील विद्यार्थी बसने शिक्षणासाठी आमगावला येतात. शाळा सुटल्यावर बसने परत जातात. मात्र बस वेळेवर येत नसल्याने शाळेत पोहचायला उशीर होतो. तर शाळा सुटल्यावर बसची वाट पाहात राहावे लागते. अशातच सायंकाळी पाच वाजताची देवरी बसफेरी बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.डोमाटोला व चिचगड बस साडेसहा वाजताच्या सुमारास येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यास आठ नऊ वाजता. जेव्हापर्यंत बस येत नाही तेव्हापर्यंत शिक्षकांना सुध्दा आपली जबाबदारी म्हणून बसस्थानकावर थांबावे लागते.विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यास उशीर होत असल्याने पालकांची सुध्दा चिंता वाढली आहे. तर विद्यार्थी घरी उशीरा पोहचत असल्याने त्यांना सुध्दा अभ्यासासाठी वेळ मिळत नाही. आगारात बसेसची संख्या कमी झाल्याने या मार्गावरील बस फेरी बंद करण्यात आल्याची माहिती आहे. मागील पंधरा दिवसांपासून ही समस्या आहे पण याची अद्याप लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनाने दखल घेतली नाही.

Web Title: Due to the closure of the bus ferry, the schoolchildren are deprived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.