पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा
By Admin | Updated: September 2, 2014 23:51 IST2014-09-02T23:51:50+5:302014-09-02T23:51:50+5:30
जिल्ह्यात पावसाची आवश्यकता असताना गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. परंतु गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पुन्हा त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा
गोंदिया : जिल्ह्यात पावसाची आवश्यकता असताना गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. परंतु गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पुन्हा त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
रोवण्या आटोपल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. यावर्षी पीक होणार नाही व आपण पुन्हा कर्जबाजारी होणार, या चिंतेने त्यांना त्रस्त करून टाकले होते. मात्र सोमवारी आलेल्या पावसाने ते सुखावले. सोमवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस थोड्याफार प्रमाणात रात्रभर सुरू राहिला.
हा पाऊस जिल्ह्यात कुठे अधिक तर कुठे कमी प्रमाणात होता. तरीसुद्धा रात्रभर सुरू असलेल्या रिमझिम पावसाने वातावरणात बदल झाला आहे. त्यासाठी काही श्रद्धाळू शेतकऱ्यांनी भगवान श्रीगणेशांचे आभार मानले.
मागील २४ तासात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये १५८.५ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. त्याची सरासरी १९.८ मिमी आहे. २ सप्टेंबरला सकाळी आठ वाजतापर्यंत जिल्ह्याच्या गोंदिया तालुक्यात २७.६ मिमी, गोरेगावात ८ मिमी, तिरोडा येथे ३९, अर्जुनी/मोरगावात २५ मिमी, देवरी येथे १२ मिमी, आमगाव येथे १८.४ मिमी, सालेकसा येथे २० मिमी व सडक/अर्जुनी तालुक्यात ८.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आला आहे.
मंगळवारीसुद्धा दिवसभर आकाश ढगाळलेले होते. या पावसामुळे शेतात काही प्रमाणात पाणी जमा झाले आहे. त्यानंतर सिंचनासाठी कालव्यांमधून सोडलेले पाणी काही दिवसांपर्यंत थांबविले जावू शकते.