सिरपूर तपासणी नाक्यावर अनधिकृत व्यक्तींची दबंगशाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:31 IST2021-09-18T04:31:27+5:302021-09-18T04:31:27+5:30
गोंदिया : तालुक्याच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या सिरपूर तपासणी नाक्यावर कुणाचाही "वॉच" नसल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनात अनधिकृत व्यक्तींकडून ...

सिरपूर तपासणी नाक्यावर अनधिकृत व्यक्तींची दबंगशाही
गोंदिया : तालुक्याच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या सिरपूर तपासणी नाक्यावर कुणाचाही "वॉच" नसल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनात अनधिकृत व्यक्तींकडून दबंगशाही सुरू आहे. अवैध वसुली करणाऱ्या खासगी व्यक्तींवर आळा बसविणे आवश्यक असले तरी सिरपूर नाक्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडत आहे.
राज्याचे परिवहन आयुक्त यांनी ११ जून रोजी पत्र जारी केले होते. त्यात राज्यातील विविध सीमा तपासणी नाक्यांवर खासगी व अनधिकृत व्यक्तींचा वावर असतो. अशा व्यक्तींकडून वाहनचालकांची अडवणूक, कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप, अडथळा निर्माण करणे, वाहनचालकांची कागदपत्रे तपासण्याचा अधिकार नसताना ताब्यात घेणे असे प्रकार होत असल्याच्या अनेक लेखी व तोंडी तक्रारी या प्राप्त होत असल्याचे म्हटले होेते; मात्र त्यानंतरही सिरपूर तपासणी नाक्यावर हा कारभार सतत सुरूच आहे. नाक्यावर कार्यरत मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक हे गणवेशधारी अधिकारी आहेत. असे असताना कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनधिकृत खासगी व्यक्तींचा वावर असून, ही बाब गंभीर असून, सतत निदर्शनात येत आहे. यामुळे नाक्यावर कार्यरत अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, त्यामुळे विभागाची प्रतिमा मलीन होत आहे.
---------------------------
आयुक्तांच्या आदेशालाच खो
सीमा तपासणी नाक्यावर संबंधित अधिकाऱ्यांचे प्रभावी नियंत्रण असणे आवश्यक आहे. त्यांना अशा अनधिकृत वा खासगी व्यक्ती सीमा तपासणी नाक्यांच्या परिसरात कारवाया करताना आढळून आल्यास, त्यांच्याविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत, असे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत; परंतु सिरपूर तपासणी नाक्यावर कोणतीही कार्यवाही न करता अधिकाऱ्यांच्या निदर्शनातच सगळा कारभार चालविला जात आहे. त्यांच्या आदेशाची येथे अवहेलना होत असून, याचा त्रास वाहनचालक-मालकांना सहन करावा लागत आहे.