केंद्राचा राज्यावर विश्वास नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 05:00 IST2021-10-06T05:00:00+5:302021-10-06T05:00:13+5:30

मागील खरीप हंगामात या दोन्ही विभागाने रेकार्ड ब्रेक धान खरेदी केली. तर खरेदी केलेल्या धानाची भरडाईसाठी उचल न झाल्याने हा धान गोदामात तसाच पडून होता. त्यामुळे रबीतील धान खरेदी लांबली होती. शाळा आणि भाड्याने गोदाम घेऊन तोडगा काढण्यात आला होता. मात्र, अद्यापही गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत २४ लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत पडला. 

Does the Center not trust the state? | केंद्राचा राज्यावर विश्वास नाही का?

केंद्राचा राज्यावर विश्वास नाही का?

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील वर्षीच्या खरीप आणि रबी हंगामातील धानाची भरडाईसाठी अजूनही उचल झाली नाही. त्यामुळे गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत २४ लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत गोदामात पडले आहे. केंद्र सरकारकडून ३० डिसेंबर २०२१ पर्यंत धान भरडाईसाठी मुदतवाढ दिली जाते. मात्र, ही मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारकडून नकार दिला जात आहे. त्यांच्या रेकार्डनुसार धान शिल्लक नसल्याची माहिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने खरोखरच धान शिल्लक आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यासाठी केंद्राने चारही जिल्ह्यांत अधिकारी पाठविले आहेत. 
पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत धानाचे सर्वाधिक उत्पादन होत घेतले जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यानंतर खरेदी केलेल्या धानाची राइस मिलर्ससह करार करून भरडाई केली जाते. 
मागील खरीप हंगामात या दोन्ही विभागाने रेकार्ड ब्रेक धान खरेदी केली. तर खरेदी केलेल्या धानाची भरडाईसाठी उचल न झाल्याने हा धान गोदामात तसाच पडून होता. त्यामुळे रबीतील धान खरेदी लांबली होती. शाळा आणि भाड्याने गोदाम घेऊन तोडगा काढण्यात आला होता. मात्र, अद्यापही गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत २४ लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत पडला. 
केंद्र सरकारकडून यासंदर्भात हिरवी झेंडी मिळेपर्यंत या धानाची उचल करणे कठीण आहे. राज्य सरकार धानाची भरडाई करून तांदूळ भारतीय खाद्य महामंडळाकडे जमा करते. यासाठी केंद्र सरकारडून ३० सप्टेंबरपर्यंत तांदूळ जमा करण्यासाठी मुदत दिली जाते. 
मात्र, मागील वर्षी धान खरेदीस विलंब झाल्याने ३० डिसेंबरपर्यंत तांदूळ जमा करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे; पण केंद्र सरकारने मुदतवाढ देण्यास मनाई केल्याची माहिती आहे. 
केंद्राच्या माहितीनुसार राज्याकडे भरडाईसाठी धानच नाही. त्यामुळे त्यांनी खरोखरच धान शिल्लक आहे किंवा नाही, याची पाहणी करण्यासाठी चार अधिकाऱ्यांना पाठविले आहे. ते धानाची मोजणी करून केंद्र सरकारकडे अहवाल सादर करणार असून त्यानंतरच मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. 

धानाची मोजणी करणार कशी? 
- गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या चारही जिल्ह्यांत लाखो क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत आहे. हे धान गोदामात पडले आहे. त्यामुळे हे धान केंद्राकडून आलेले अधिकारी मोजणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची यंत्रणासुद्धा तणावात आहे. 

खरिपातील धान खरेदी होणार कशी?
- मागील वर्षी खरेदी केलेल्या खरीप आणि रबीतील धानाची अद्यापही उचल करण्यात आली नाही. त्यामुळे नवीन खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे, असा प्रश्न आहे. ऑक्टोबरपासून नवीन धान खरेदीला सुरुवात होणार आहे. मात्र, गोदामात धान शिल्लक असल्याने नवीन खरेदी केलेले धान ठेवायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे धान खरेदी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Does the Center not trust the state?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.