Doctors Protection Kit Smashed In Gondia Medical | Corona Virus in Gondia; गोंदियातील मेडिकलमध्ये डॉक्टरांच्या प्रोटेक्शन किटचा तुटवडा

Corona Virus in Gondia; गोंदियातील मेडिकलमध्ये डॉक्टरांच्या प्रोटेक्शन किटचा तुटवडा

ठळक मुद्देगरज १२०० ची उपलब्ध केवळ ३०डॉक्टरांसमोर समस्या : कोरानाचा प्रादुर्भाव

अंकुश गुंडावार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) सध्या एका कोरोना बाधीत रुग्णावर उपचार सुरू आहे. मात्र रुग्णावर उपचार करताना त्याचा डॉक्टरांना संसर्ग होऊ नये,यासाठी प्रोटेक्शन किटचा वापर केला जातो. मात्र सध्या येथील मेडिकल कॉलेजमध्ये १२०० प्रोटेक्शनची किटची गरज असताना केवळ ३० किट उपलब्ध असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. तर बाजारपेठेत सुध्दा याचा तुटवडा असल्याने वितरकांकडून पुरवठा होत नसल्याची माहिती आहे.
देशासह राज्यात सध्या कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील रुग्णांचा आकडा १९७ वर पोहचला आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांची गर्दी सुध्दा दररोज वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. बहुतेक जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षाविषयक साधना अभावी कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गोंदिया येथे शुक्रवारी कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर आली. कोरोना बाधीत रुग्णावर सध्या मेडिकलमधील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू असून त्याच्यावर मेडिकलचे डॉक्टर उपचार करीत आहेत. सुदैवाने मागील दोन दिवसात जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाचा रुग्ण आढळला नसून १३ जणाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून ९ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. कोरोना बाधीत आणि संशयीत रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांना सुध्दा आवश्यक ती खबरदारी घ्यावी लागते. यासाठी त्यांच्यासाठी प्रोटेक्शन किट असते. मात्र येथील वैद्यकीय महाविद्यालयात १२०० प्रोटेक्शन किटची गरज असताना सध्या केवळ ३० किट उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील व्यवस्थापनासमोर देखील मोठा पेच निर्माण झाला आहे. मेडिकल कॉलेजची यंत्रणा मागील आठवडाभरापासून प्रोटेक्शन किट कुठून उपलब्ध होतेय का याचा शोध घेत आहे. मात्र रविवारपर्यंत ते उपलब्ध झाले नव्हते. तर एका वितरकाशी मेडिकलने संपर्क साधला असता डॉक्टरांसाठी लागणाºया प्रोटेक्शन किटचा सध्या पुरवठा होत नसल्याने तुटवडा निर्माण झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान मेडिकलला डॉक्टरांसाठी लागणारे प्रोटेक्शन किट उपलब्ध न झाल्यास बाधीत रुग्णावर उपचार करणाºया डॉक्टरांच्या आरोग्याचा सुध्दा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत आहे. यासंदर्भात मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रुखमोडे यांच्याशी संपर्क साधला असता दोन दिवसात डॉक्टरांसाठी लागणारे प्रोटेक्शन किट उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

नियोजनाचा अभाव
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथील मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापनाने डॉक्टरांसाठी लागणाºया प्रोटेक्शनची किटची मागणी करुन ठेवण्याची गरज होती. मात्र ही बाब फारशी गांर्भियाने न घेतल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे बोलल्या जाते.विशेष मेडिकल कॉलेजमध्ये यापूर्वी सुध्दा अनेकदा औषधांचा पुरवठा न झाल्याने समस्या निर्माण झाली होती.

थकीत देयकाचा प्रश्न कायम
मेडिकल कॉलेजला हॉफकिन्स कंपनीकडून औषधांचा पुरवठा करण्यात येतो.तर कधी वेळेत औषधे उपलब्ध न झाल्यास मेडिकल व्यवस्थापन स्थानिक स्तरावर औषधांची खरेदी करते. मात्र औषधांचा पुरवठा करणाºया कंपन्याची पाच ते सहा कोटी रुपयांची देयके गेल्या वर्षभरापासून थकली असल्याची माहिती आहे.

Web Title: Doctors Protection Kit Smashed In Gondia Medical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.