नुकसानग्रस्तांची यादी तातडीने करा

By Admin | Updated: March 4, 2015 01:18 IST2015-03-04T01:18:21+5:302015-03-04T01:18:21+5:30

तिरोडा तालुक्यात पावसाने थैमान घातले. २४ तासात तालुक्यात ११० मिमी

Do the list of damages promptly | नुकसानग्रस्तांची यादी तातडीने करा

नुकसानग्रस्तांची यादी तातडीने करा

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : आमदारांसह केली परसवाडा परिसरात पाहणी
परसवाडा :
तिरोडा तालुक्यात पावसाने थैमान घातले. २४ तासात तालुक्यात ११० मिमी व परसवाडा महसुली मंडळात ११७ मिमी पावसाची नोंद झाली. अकाली पावसाने चना, लाखोरी, जवस, गहू, भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अमित सैनी व इतर अधिकाऱ्यांनी यावेळी पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतला. चार दिवसात नुकसानग्रस्तांची यादी तयार करण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
मुंडीकोटा १३० मिमी, ठाणेगाव ९५ मिमी, वडेगाव ९० मिमी, परसवाडा ११७ मिमी याप्रमाणे तालुक्यात चारही महसुली मंडळात अतिवृष्टी झाली. मुंडीकोटा परिसरात घाटकुरोडा, चांदोरी, बिरोली, घोघरा, मांडवी, करटी खुर्द, पुजारीटोला, मरारटोला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजीपालाचे पिक घेतले जात.
सर्व पिक भुईसपाट पाण्यात बुडाले आहेत. परसवाडा परिसरात हरभरा, लाखोरी, जवस, गहू पिकांचे संपूर्ण नुकसान झाले.
तालुक्यात १२५ महसुली गावे असून हरभरा सर्वसाधारण क्षेत्र ९१० हेक्टर असून बागायती हरभरा ४६० हेक्टर, कोरडवाहू ४९७, गहू सर्वसाधारण क्षेत्र ४०० हेक्टर यात बागायती २१४, कोरडवाहू १९३ हेक्टर, जवस सर्वसाधारण क्षेत्र १३१७ हेक्टर, कोरडवाहू फोकीव ७९७ हेक्टर, पेरीव ५.५० हेक्टर, लाखोरी ३५०० हेक्टर, भाजीपाला २४४ हेक्टर एकूण ६६८७ हेक्टरमध्ये सर्व पिकांची लागवड करण्यात आली होती. यात सर्वच पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे.
या सर्व पिकांची पाहणी परसवाडा क्षेत्रात करटी बु., बाघोली, परसवाडा येथे डॉ. योगेंद्र भगत यांच्या शेतातील परिसरातील हरभरा, जवस, लाखोरी, गहू व करटी बु. येथे भाजीपाला पिकांची पाहणी आ. विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे, जि.प. सदस्य डॉ. योगेंद्र भगत, उपविभागीय अधिकारी प्रविण महीरे, तहसीलदार शुभांगी आधंळे, खंडविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, ताकृअ पोटदुखे, कृषी अधिकारी चरडे, रमेश पटले, तलाठी हटवार, गेडाम, बारसे आदींनी केली. जिल्हाधिकारी यांनी चार दिवसात संपूर्ण नुकसानीची गावनिहाय यादी सर्वेक्षण करून पूर्ण करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी महिरे, तहसीलदार आंधळे यांना दिले.
तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनीव्दारे माहिती दिली. आर्थिक मागणीही केली असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Do the list of damages promptly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.