- ४२८ वॉरियर्सचे केले लसीकरण : आता कोरोना वॉरियर्स येत आहेत पुढे
गोंदिया : अवघ्या देशात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली असून त्यानुसार जिल्ह्यातही ठरवून दिल्याप्रमाणे फ्रंटलाईन कोरोना वॉरियर्सचे लसीकरण केले जात आहे. या लसीकरण मोहिमेंतर्गत शनिवारी (दि.२३) घेण्यात आलेल्या लसीकरणात तब्बल ४२८ वॉरियर्सचे लसीकरण करण्यात आले आहे. याची टक्केवारी १४३ टक्के एवढी असून यामुळेच शनिवारच्या लसीकरणात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
शासनाने भारतात तयार झालेल्या लसींना परवानगी देत १६ जानेवारी रोजी अवघ्या देशात लसीकरणाला सुरुवात केली आहे. मात्र यामध्ये सर्वप्रथम फ्रंटलाईन कोरोना वॉरियर्सचेच लसीकरण करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील ८४२८ फ्रंटलाईन कोरोना वॉरियर्सचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी सध्या जिल्ह्यात येथील वैद्यकीय महाविद्यालय, तिरोडा येथील उप जिल्हा रूग्णालय तर देवरी येथील ग्रामीण रूग्णालय या ३ केंद्रांतच लसीकरण केले जात आहे. तसेच प्रत्येक केंद्राला प्रत्येकी १०० प्रमाणे एकूण ३०० वॉरियर्सचे लसीकरण करण्याचे ठरवून देण्यात आले आहे.
१६ जानेवारी लसीकरण मोहिमेची सुरुवात झाल्यांतर मंगळवारी (दि.१९), बुधवारी (दि.२०), शुक्रवारी (दि.२२) तसेच शनिवारी (दि.२३) वॉरियर्सचे लसीकरण करण्यात आले. मात्र विशेष बाब म्हणजे, शनिवारी (दि.२३) घेण्यात आलेल्या लसीकरणात ठरवून दिलेला ३०० वॉरियर्सचा आकडा पार करीत जिल्ह्यात तब्बल ४२८ वॉरियर्सचे लसीकरण करण्यात आले आहे. म्हणजेच, १४३ टक्के वॉरियर्सचे या दिवशी लसीकरण करण्यात आल्याने शनिवारी लसीकरणाच्या मोहिमेत गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
-------------------------------
स्पॉट रजिस्ट्रेशनचा फायदा
लसीकरणात आता फक्त कोरोना वॉरियर्सलाच लस दिली जाणार असून त्यानुसार जिल्ह्यात ८४२८ वॉरियर्सची यादी कोविन ॲपमध्ये फिड करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक केंद्राला १०० वॉरियर्सलाच लस देण्याचे ठरवून देण्यात आले होते. मात्र आता हे निर्बंध उठविण्यात आले असून लस घेण्यास इच्छुक वॉरियर्स केंद्रावर जाऊन आपल्या सोयीने लस घेऊ शकतात. यासाठी आता स्पॉट रजिस्ट्रेशनची सुविधा त्यांना देण्यात आली आहे. शिवाय लसीकरणाला आता आठवडा झाला असून लस घेणाऱ्या कुणालाही काहीच त्रास झाला नसल्याने लस घेण्यासाठी वॉरियर्स स्वत: पुढे येत आहेत. यामुळेच लसीकरणाला वेग आला असून ठरवून दिलेल्या आकडेवारी पेक्षा जास्त वॉरियर्सचे शनिवारी लसीकरण करण्यात आले आहे.
-----------------------------
आतापर्यंत तब्बल १२६७ वॉरियर्सचे लसीकरण
१६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली असून सर्वप्रथम ८४२८ कोरोना वॉरियर्सला लसीकरण करावयाचे आहे. यानुसार लसीकरण केले जात असून १६ तारखेनंतर, १९, २०, २२ व २३ तारखेला म्हणजेच एकूण ५ दिवस लसीकरण करण्यात आले आहे. या ५ दिवसांत तब्बल १२६७ कोरोना वॉरियर्सचे लसीकरण करण्यात आले असून याची टक्केवारी १५ टक्के एवढी आहे. याच गतीने जिल्ह्यात लसीकरण सुरू राहिल्यास कोरोना वॉरियर्सचा पहिला टप्पा लवकरच आटोपणार यात शंका नाही.
---------------------------
आठवड्यातून ५ दिवस लसीकरण
अगोदर जिल्ह्यात मंगळवार, गुरूवार व शनिवार हे ३ दिवस कोरोना लसीकरणासाठी ठरवून देण्यात आले होते. मात्र फक्त ३ दिवस कोरोना लसीकरण केल्यास लसीकरणाची ही मोहीम बराच वेळ घेणार हे स्पष्ट होते. म्हणून त्यात आता बदल करण्यात आला आहे. आता मंगळवार व रविवार हे २ दिवस सोडून आठवड्यातील ५ दिवस कोरोना लसीकरण केले जाणार आहे. यामुळे लसीकरणाला गती येणार व लवकरात लवकर सर्वसामान्यांचाही लसीकरणासाठी नंबर लागणार आहे.