जिल्हा बँक बरखास्त करा
By Admin | Updated: March 12, 2015 01:13 IST2015-03-12T01:13:06+5:302015-03-12T01:13:06+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर असतानाही गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्याकडून कर्ज वसुलीसाठी सक्तीने जप्तीची कारवाई करीत आहे.

जिल्हा बँक बरखास्त करा
गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर असतानाही गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्याकडून कर्ज वसुलीसाठी सक्तीने जप्तीची कारवाई करीत आहे. ही वसुली नियमबाह्य असून शेतकऱ्यांमध्ये भाजप सरकारविरोधी चित्र निर्माण करणारे आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी शासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा उपप्रतिबंधक दिग्विजय अहेर यांच्यामार्फत बुधवारी (दि.११) सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह संबंधितांना देण्यात आले.
निवेदनात नमुद केल्यानुसार शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर असताना गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नियमबाह्य पद्धतीने सक्तिची कर्जवसुली व जप्तीची कारवाई करीत आहे. राज्यात राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता असताना या १५ वर्षामध्ये त्यांना शेतक ऱ्यांकडून कर्ज वसुलीची आठवण झाली नाही. मात्र भाजपची सत्ता येताच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपला बदनाम करण्याकरीता वसुली करुन भाजप सरकार शेतकरीविरोधी असल्याचे चित्र उभे केले जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.
वास्तविक नियमाप्रमाणे कर्जाच्या वसुलीकरीता जप्ती करावयाची असल्यास रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेटची आवश्यकता असते. तसेच जप्तीची कारवाई करण्याआधी नियमाप्रमाणे परिशिष्ठ ३ प्रमाणे नोटीस दिली जाते व जिल्हा उपनिबंधकांकडे त्याची रितसर सुनावनी घेऊन शेतकऱ्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. मात्र प्रत्यक्षात अशी कुठलीही प्रक्रिया न करता जीडीसीसी बँक शेतकऱ्यांच्या जिवावरच उठली असल्याचा आरोप करण्यात आला. सध्या बँकेचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांकडे जावून वसुलीकरीता शेतकऱ्यासह त्यांच्या कुटुंबाशी अभद्र व्यवहार करीत आहेत. त्यामुळे बँकेद्वारे सुरु असलेली सक्तिची वसुली त्वरीत थांबविण्यात यावी व शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. अन्यथा भाजप आंदोलनाची भूमिका घेईल, असा इशारा देण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)