विकास कामांत असमतोल

By Admin | Updated: July 15, 2016 02:05 IST2016-07-15T02:05:38+5:302016-07-15T02:05:38+5:30

आपला महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र मानला जातो. देशातील चार पाच अग्रणी राज्यांमध्ये महाराष्ट्राचा नेहमीच समावेश होतो.

Developmental imbalance | विकास कामांत असमतोल

विकास कामांत असमतोल

रस्त्यांवर चालणे कठीण : ८० टक्के गावे चिखलाने माखलेलीच
सालेकसा : आपला महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र मानला जातो. देशातील चार पाच अग्रणी राज्यांमध्ये महाराष्ट्राचा नेहमीच समावेश होतो. परंतु याच पुरोगामी महाराष्ट्रात ग्रामीण भागातील रस्ते व लोकांच्या राहणीमानाची परिस्थिती बघून खरोखरच महाराष्ट्र कुठे आहे, याची खरी प्रचिती येते. सद्यस्थितीत सालेकसा तालुक्यातील ८० टक्के गावे चिखलाने माखलेले दिसत असून रस्त्यांची तर अत्यंत दयनिय अवस्था आहे. त्यातून तालुक्याच्या विकासातच असंतुलन असल्याचे दिसून येते.
स्वातंत्र्याची सत्तरी गाठण्याचा उंबरठ्यावर देश आला, तरीसुध्दा गावांची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे शासन-प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह पडतो. ग्रामीण भागातील गावे विकासाच्या प्रवाहात येत नसतील तर कसले स्वातंत्र्य, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित नेहमीच करतात.
सालेकसा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजची परिस्थिती पाहून, शासनाच्या योजना म्हणजे ‘आसमान से टपका और खजुर पे अटका’ सारखी वाटत आहेत. आपले शासन स्वत:ची वाहवाही लुटण्यात मदमस्त आहे. जनता मात्र पूर्वीप्रमाणेच संघर्षमय वातावरणात जगत आहे.
तालुक्यातील ८० टक्के गावात चिखलाचे साम्राज्य आहे. सालेकसा तालुक्यात एकूण गावांची संख्या ८५ असून त्या व्यतिरीक्त सात रिठी गाव आहेत. या एकूण गावांना ४२ ग्रामपंचायतीत मोडण्यात आले आहे. यात काही गावांत स्वतंत्र ग्रामपंचायती आहेत, तर बहुतेक ग्रामपंचायतीत एकापेक्षा जास्त टोल्यांचा समावेश आहे. काही ग्रामपंचायती पाचपेक्षा जास्त टोल्यांची आहेत. एक ग्रामपंचायत तर १८ टोल्यांचीसुध्दा आहे.
ग्रामपंचायतीची रचना ही तेथील लोकसंख्येच्या आधारावर निर्मित केलेली असते. त्यानुसार विकास वार्ड व विकासनिधी मिळण्याचे नियोजन असते. त्यानुसार कमोबेश सगळ्याच गावांचा विकास झाला पाहिजे. परंतु या तालुक्यात विकासाच्या बाबतीत मोठा असमतोल दिसत आहे. त्यात रस्ते निर्मितीबद्दल तर खूपच तफावत दिसून येते. पावसाळ्याचे निमित्त साधून तालुक्यातील गावांच्या रस्त्यांची सध्याची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करून घेण्यासाठी तालुक्यात भ्रमण केले असता आजघडीला ८० टक्के गाव चिखलाने माखलेले व घाणयुक्त रस्ते असलेले दिसून आले. शेतकरी असोत, महिला असोत किंवा विद्यार्थी असोत त्यांना घराबाहेर निघताच रस्त्यावरून चालणे फारच गैरसोयीचे झालेले दिसून आले.
सायकल किंवा मोटर सायकलने रस्त्यावरून जाणे तर अघोषित संचार बंदीसारखे वाटत असते. तालुक्यातील बाम्हणी, नवेगाव, पोवारीटोला, कावराबांध, खोलगड, नानव्हा, मुंडीपार, पाथरी, पिपरिया, दरबडा, साखरीटोला, तिरखेडी, दर्रेकसा, निंबा, कहाली, आमगाव खुर्द , बोदलबोडी, कोसमतर्रा, जमाकुडो, झालीया, गोर्रे, टोयागोंदी, कोटरा, लोहारा यासह इतरही ग्रामपंचायती अंतर्गत अनेक गावे चिखलमय वातावरणात जगण्याची सवय लावून जगत आहेत, असे आढळले.(तालुका प्रतिनिधी)

पक्क्या रस्त्यांचे वय फक्त एक वर्ष !
कोणत्याही गावात सिमेंट क्रांकीटचा रस्ता बनत असताना आता आपल्या गावात पक्का रस्ता बनत आहे, असेच वाटते. यापुढे चिखलापासून मुक्ती मिळेल, असे लोक समजू लागतात. परंतु अवघ्या एक ते दीड वर्षातच रस्त्याच्या बाबतीत गावकऱ्यांचा मोहभंग झालेला असतो. लगेच दुसऱ्यावर्षी सिमेंट रस्त्याची अवस्था एवढी वाईट होते की माती मुरूमाची रस्ते त्यापेक्षा चांगले वाटतात. एकदा रेकार्डवर पक्का रस्ता म्हणून नोंद झाली की त्या रस्त्याचे अस्तित्व असो किंवा नसो, त्या ठिकाणी नवीन रस्ता नाही अन् दुरूस्ती पण होत नाही. सालेकसा मुख्यालयाच्या ठिकाणी शहराच्या मधात काही रस्ते याची ताजे उदाहरणे आहेत.
मंजूर निधीतून २५ टक्के रकमेचाच खरा वापर
एकट्या लोकप्रतिनिधीच्या विकास निधीतून रस्त्याचे काम मंजूर झाले की, एकाने काम दिले दुसऱ्याला, त्याने विकून दिले तिसऱ्याला व ते काम चौथ्याकडून करवून घेतले. या प्रक्रियेत मंजूर निधीतील ५० टक्के रक्कम टक्केवारीत निघून जाते. शेवटी रस्ता निर्माण करून कमाई करण्याचा गुणा-भाग करीत असताना २५ टक्के निधी त्या रस्त्यासाठी वापरतात की काय, असे वाटते. अशात त्या नवीन रस्त्यांची वय किती राहील, याचा अंदाज आपण लावू शकतो. परंतु गावाची परिस्थिती ‘जैसे थे’ बनून राहते आणि विकासाच्या नावावर माईकवर बोलणे सुरूच राहते. एकीकडे डिजिटल इंडिया तर दुसरीकडे तोच जुना ग्रामीण भारत, असे वास्तव आहे.

Web Title: Developmental imbalance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.