मार्केटिंगअभावी अडला वनपर्यटनाचा विकास
By Admin | Updated: September 27, 2015 01:15 IST2015-09-27T01:15:05+5:302015-09-27T01:15:05+5:30
गोंदिया विपुल वनसंपदा आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या गोंदिया जिल्ह्यात व्याघ्र संवर्धनास भरपूर वाव आहे.

मार्केटिंगअभावी अडला वनपर्यटनाचा विकास
मनोज ताजने गोंदिया
विपुल वनसंपदा आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या गोंदिया जिल्ह्यात व्याघ्र संवर्धनास भरपूर वाव आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली. त्याअंतर्गत चार अभियारण्य आणि एक राष्ट्रीय उद्यान जिल्ह्यात कार्यरत आहे. पण अजूनही वनपर्यटनाची आवड असणाऱ्या पर्यटकांची पावलं इकडे वळत नाहीत. कारण एकच, ते म्हणजे मार्केटिंगचा अभाव. या मार्केटिंगसाठी राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती कमी पडते, की मार्केटिंगसाठी असणारा निधी कागदावरच जिरविला जातो? अशी शंका येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्पाची घोषणा तीन वर्षांपूर्वी झाली असली तरी नागझिरा अभयारण्य आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यानाच्या उभारणीस अनेक वर्षे झाली आहेत. वाघांसह अनेक वन्यप्राण्यांच्या अस्तित्वासाठी नागझिरा ओळखले जाते तर नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचा परिसर विदेशी पक्ष्यांच्या वास्तव्यासह प्रसिद्ध आहे. पण इतक्या वर्षात या राष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनस्थळांना ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जाही प्रशासकीय यंत्रणा मिळवून देऊ शकली नाही. त्यामुळेच वनपर्यटकांसाठी एक पर्वनी ठरणाऱ्या या स्थळांचा विकास होऊ शकला नाही. पर्यटकांसाठी राहण्याची आणि कँटीनची सोयही पुरेशा प्रमाणात आतापर्यंत या ठिकाणी उपलब्ध नव्हती. दोन वर्षांपूर्वी वनविभागाची संकुले वनविकास महामंडळाकडे (एफडीसीएम) सोपविल्यानंतर त्यांनी काही प्रमाणात ही संकुले विकसित करून तेथे बऱ्यापैकी सोयी केल्या आहेत. मात्र उपलब्ध सोयींसह, वनभ्रमंतीची सोय, दिसणारे वन्यजीव, वनभ्रमंतीची वैशिष्ट्य, नैसर्गिक सौंदर्य, विविध वनस्पती अशा कोणत्याची गोष्टींचे मार्केटिंग कोणाकडून होताना दिसत नाही. त्यामुळे वर्षभरात जेमतेम ४० हजाराच्या घरात पर्यटक येथे भेटी देतात. आता आॅनलाईन बुकिंगची सोय झाल्याने दूरच्या पर्यटकांसाठी सोयीचे झाले आहे. योग्य मार्केटिंग झाल्यास पर्यटकांचा आकडा १ लाखाच्या वर जाऊ शकतो. त्यातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल.
- असे आहे नागझिरा वन्यजीव अभयारण्य
गोंदियापासून ४० किलोमीटर अंतरावर नागझिरा आहे. नागपूरवरून रस्ता मार्गे साकोली आणि तेथून पिटेझरी गेटमधून नागझिऱ्यात प्रवेश करता येतो. दुसरे गेट चोरखमारा गेट (गोंदियावरून ४० किलोमीटर) आणि तिसरे मंगेझरी गेट (गोंदियावरून २५ किलोमीटर) आहे. नागझिऱ्याच्या तीनही गेटपर्यंत खासगी वाहन घेऊन जावे लागते. एस.टी.बस साकोलीपर्यंतच जाते. जंगल सफारीसाठी वनविभागाने चोरखमारा आणि पिटेझरी या गेटवर दोन खुल्या जिप्सी उपलब्ध केल्या आहेत.
सकाळी ६.३० ते ११.३० आणि दुपारी ३ ते ६ अशा टप्प्यात नागझिऱ्यात भ्रमंती करता येते. एकावेळी केवळ २० गाड्या सोडल्या जातात. पट्टेवार वाघांसह बिबट, हरिण आणि इतर अनेक वन्यप्राणी येथे आहेत. मात्र वाघ, बिबट्याचे दर्शन प्रत्येक वेळी होतेच असे नाही.
नागझिऱ्यात निवासासाठी वनविभागाचे वेगवेगळे रेस्ट हाऊसेस आहेत. पण ते सर्व आता एफडीसीएमकडे (महाराष्ट्र वनविकास महामंडळ) चालविण्यासाठी दिलेली आहेत. तेथील निवासासाठी किंवा जंगल सफारीसाठी आॅनलाईन बुकिंग करावे लागते. या रेस्ट हाऊस परिसरात कँटीनची व्यवस्था आहे. तेथे वनविभागाच्या नियमानुसार केवळ शाकाहारी भोजन मिळते.
कुठे गेला नागझिरा महोत्सव?
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री अनिल देशमुख यांनी नागझिरा महोत्सवाची कल्पना मांडली होती. या महोत्सवाच्या निमित्ताने बाहेरील पर्यटक येथे येतील. येथील वनपर्यटनाचे मार्केटिंग करता येईल अशी त्यांची कल्पना होती. त्यादृष्टीन नागझिऱ्यावरील माहितीपटही तयार करण्यात आला. मात्र नंतर महोत्सवाचे स्वरूप, त्यावरील खर्चाची तरतूद या विषयावर कोणीच पुढाकार घेतला नाही. त्यामुळे या महोत्सवाची कल्पनाच मागे पडली. खा.नाना पटोले आता नागझिरा महोत्सव सोडून भंडारा जिल्ह्यात ‘वैनगंगा महोत्सव’ करण्याच्या विचारात आहेत. पण त्यात वनपर्यटनाला चालना देण्याचे कोणतेही नियोजन नाही.
बोटिंग व प्राणी कल्याण केंद्र
नवेगाव राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या मामा तलावात पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा केली जाणार आहे. याशिवाय बांधकाम पूर्ण झालेल्या एका गेस्ट हाऊसचेही लवकरच लोकार्पण केले जाणार असून जखमी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी येथे प्राणी कल्याण केंद्र उभारले जाणार आहे. तसेच पर्यटकांसाठी नवीन टेंट उभारणीसाठीही प्रयत्न सुरू आहेत. या कामांसाठी नवीन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पुढाकार घेतला आहे.
- असे आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान
नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदियापासून ७० किलोमीटर अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्गावरील कोहमारा येथून नवेगाव राष्ट्रीय उद्यान २५ किलोमीटर अंतरावर आहे. येथे संजय कुटी, हॉलिडे होम, डॉर्मेट्री अशी निवास व्यवस्था एफडीसीएमकडे आहे. याचेही बुकिंग आॅनलाईन केले जाते.
उद्यानालगत कँटीनची सोय आहे, तिथे आॅर्डरप्रमाणे (शाकाहारी) जेवण तयार करून मिळते. नवेगावबांध येथे फिरण्यासाठी स्वत:च्या खासगी वाहनानेच जावे लागते. सकाळी ६.३० ते ११.३० आणि दुपारी ३ ते ६ अशा फेऱ्यांमध्ये येथेही फिरावे लागते. नागझिऱ्याच्या तुलनेत नवेगाव राष्ट्रीय उद्यानात वाघांची संख्या कमी आहे. मात्र येथील मामा तलाव विदेशी पक्ष्यांचे हे आवडीचे ठिकाण असल्यामुळे दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी या काळात येथे मोठ्या संख्येने विदेशी पक्षी येतात. त्यामुळे पक्षीनिरीक्षणासाठी हे ठिकाण खूप महत्वाचे आहे. मात्र गेल्या १५ वर्षात येथे निवास व्यवस्था, कँटीन याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पर्यटक आणि पक्षीप्रेमींची संख्या गेल्या काही वर्षात नवेगावमध्ये रोडावली आहे.
या ठिकाणी शासनाने १ कोटी रुपये खर्चुन विकसित केलेल्या बगिचाचे गेल्या पाच वर्षांपासून लोकार्पणच झाले नाही. कंत्राटदाराकडून हा बगिचा अजूनही जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरित झालेला नाही. या ठिकाणी पक्षीप्रेमी आणि पर्यटकांसाठी पुरेशा सोयी, सुसज्ज कँटीनसह पक्षी निरीक्षणासाठी दुर्बिणींची व्यवस्था करणे गरजेचे आहे.