केशोरी परिसराचा विकास करणार
By Admin | Updated: January 29, 2015 23:09 IST2015-01-29T23:09:47+5:302015-01-29T23:09:47+5:30
या परिसरातील शेतकऱ्यांना सुजलाम-सुफलाम बनविण्यासाठी उपासीनाला प्रकल्पाच्या निर्मितीकडे विशेष लक्ष देवू. केशोरी परिसराचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,

केशोरी परिसराचा विकास करणार
पालकमंत्र्यांची ग्वाही : भाजप सदस्य नोंदणी अभियानांतर्गत कार्यकर्ता मेळावा
केशोरी : या परिसरातील शेतकऱ्यांना सुजलाम-सुफलाम बनविण्यासाठी उपासीनाला प्रकल्पाच्या निर्मितीकडे विशेष लक्ष देवू. केशोरी परिसराचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.
भाजप सदस्य नोंदणी अभियानांतर्गत कार्यकर्ता मेळावा व भाजप केशोरीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.
ना. बडोले पुढे म्हणाले, आदिवासीबहुल असलेल्या वारव्ही, गार्डनपूर, अंभोरा, चिसटोला या गावांतील तलावांच्या खोलीकरणासह मालगुजारी तलावांची कामे करून या भागातील शेती सिंचन व्यवस्था वाढविण्याचा प्रयत्न करू. तसेच या भागातून वाहणाऱ्या गाढवी नदीवर साखळी बंधारे तयार करून कायमस्वरूपी शेतीला पाणी पुरविण्याची व्यवस्था करून शेतकऱ्यांच्या धानाला प्रतिक्विंटल २ हजार ५०० रूपये भाव मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. आपण माझ्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे या भागाचा विकास करण्यास मी कटिबद्ध आहे, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
अध्यक्षस्थानी माजी आ. दयाराम कापगते होते. अतिथी म्हणून भाजप तालुकाध्यक्ष रघुनाथ लांजेवार, अर्थ व बांधकाम सभापती प्रकाश पाटील गहाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काशिम जमा कुरैशी, पं.स. सभापती ताणेश ताराम, लक्ष्मीकांत धमगाये, केवळराम पुस्तोडे, ग्रा.पं. सदस्य नंदकुमार पाटील गहाणे, दयाराम शहारे, चंद्रशेखर टेंभुर्णे, हरिशचंद्र उईके, तेजुकला गहाणे, रामदास देशकर, माला हुमणे, प्रभा वासनिक उपस्थित होते.यावेळी नव्याने भाजप पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा ना. बडोले यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महिला स्मारक समितीतर्फे ओवाळणी घालून बडोले यांना शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. मात्र या कार्यक्रमात मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शाखा केशोरीच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले. नंदू पाटील गहाणे यांनी परिसरातील समस्या व शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्या प्रास्ताविकातून ना. बडोले यांच्याकडे मांडल्या. संचालन देवा शेंडे यांनी तर आभार ताणेश ताराम यांनी मानले.
कार्यक्रमासाठी विलास बोरकर, विजय गहाणे, परमानंद गहाणे, भाऊराव गहाणे, ओमप्रकाश गहाणे, अशोक देशकर व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)