रोजगार निर्मितीतून विकास साधा

By Admin | Updated: September 26, 2015 01:57 IST2015-09-26T01:57:22+5:302015-09-26T01:57:22+5:30

जिल्ह्यात उपलब्ध असलेली नैसर्गिक साधन संपत्ती, पाण्याची उपलब्धता आणि शेतीपुरक व्यवसायांचा विचार करुन ....

Develop development through employment | रोजगार निर्मितीतून विकास साधा

रोजगार निर्मितीतून विकास साधा

विजय सूर्यवंशी : जिल्हाधिकारी कार्यालयात शेती विकासावर सभा
गोंदिया : जिल्ह्यात उपलब्ध असलेली नैसर्गिक साधन संपत्ती, पाण्याची उपलब्धता आणि शेतीपुरक व्यवसायांचा विचार करुन जास्तीत जास्त रोजगार निर्मितीतून विकास साधण्याचे नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. शेती संलग्नित विकासाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच आयोजित सभेत ते बोलत होते.
डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, जिल्ह्यात टसर रेशीम विकासाला चालना मिळण्यासाठी टसर रेशीम विकासाचा आराखडा तयार करावा व त्याची अंमलबजावणी एका महिन्याचा आत करावी. देवरी तालुक्यातील तीन आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नऊ गावात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेषत: संबंधित गावातील महिलांना टसर कोषापासून धागा तयार करण्याचे प्रशिक्षण द्यावे. वनविभाग व रेशीम विभाग यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान व बायफ या संस्थांना सोबत घेवून प्रकल्प यशस्वी करावा, वनविभागाने वनातील अर्जुन व ऐन ही टसर रेशीम उपयोगी झाडे या प्रकल्पासाठी राखून ठेवावी.
इटियाडोह येथील मत्स्यबीज निर्मिती केंद्र यशस्वीपणे चालण्यासाठी व जास्तीत जास्त मत्स्यबीजांची निर्मिती करण्यासाठी मत्स्य सहकारी संस्था अथवा खाजगी संस्थेला चालविण्यासाठी देता येईल काय याची खात्री करावी असे त्यांनी सांगीतले. तर मामा तलावांचे खोलीकरण व गाळ काढण्याचे काम राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून प्राधान्याने घेऊन जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय विकासाला चालना द्यावी. तसेच मत्स्य सहकारी संस्थांना देण्यात आलेल्या पाटबंधारे तलावात मत्स्यबीजांचे संगोपन करण्यासाठी पोटतळी तयार करता येईल. राज्य मत्स्य उद्योग विकास महामंडळामार्फत दोन वाहने देण्यात आलेली असून या वाहनांचा सदुपयोग करण्यासाठी हाजराफॉल व नवेगावबांध या पर्यटनस्थळी ही वाहने देण्यात यावी.
जिल्ह्यात जास्तीत जास्त दुधाळ जनावरांची पैदास व्हावी व जास्तीत जास्त दुग्ध उत्पादन व्हावे. शेतीपूरक व्यवसायातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या समन्वयातून पशुधन अधिकाऱ्याने विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.
शिका व कमवा या योजनेंतर्गत शिक्षणाची आवड असणारे परंतु आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण न घेवू शकणाऱ्या युवक-युवतींना रोजगाराच्या संधी योग्य नियोजनातून उपलब्ध करुन द्याव्यात. शिका व कमवा या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींना त्वरित देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्फत ही योजना राबविण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सभेला उपजिल्हाधिकारी शिंदे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेज, पशुधन विकास अधिकारी पटले, महिला आर्थिक विकास महामंडळाचे सुनील सोसे, जीवनोन्नती अभियानाचे सचिन देशमुख, आत्माचे प्रकल्प संचालक कुरील, वायफचे सल्लागार के.के. चॅटर्जी, डॉ. विजय ताटे, लपाचे बगमार व संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Develop development through employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.