आरोग्य खात्याचा गचाळ कारभार; रूग्णांचे हाल
By Admin | Updated: June 26, 2014 23:20 IST2014-06-26T23:20:00+5:302014-06-26T23:20:00+5:30
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा रामभरोसे चालत असून याबाबत काही न बोललेलेच बरे अशी स्थिती आहे. कारण, जिल्हास्थळी असलेल्या कुवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रूग्णालय व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात

आरोग्य खात्याचा गचाळ कारभार; रूग्णांचे हाल
अधिकांश पदे रिक्त : घाणीच्या विळख्यात रुग्णालय परिसर
कपिल केकत - गोंदिया
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा रामभरोसे चालत असून याबाबत काही न बोललेलेच बरे अशी स्थिती आहे. कारण, जिल्हास्थळी असलेल्या कुवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रूग्णालय व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात आरोग्य सेवेच्या नावावर फक्त रूग्णांचे धिंडवडे काढले जात असल्याचे चित्र आहे. एकतर रूग्णालय परिसरात पाहिजे तशी स्वच्छता नाही. शिवाय येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमर्जी कारभार रूग्णांच्या जीवावर उठला आहे. येथील केटीएस व बिजीडब्ल्यु रूग्णालयासह उपजिल्हा रूग्णालय तसेच ग्रामीण रूग्णालयांत अधिकांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे रूग्णांना मिळाव्या त्या सुविधा मिळत नाहीत. प्रतिनिधींनी रूग्णालयातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी फेरफटका मारला असता रूग्णालयातील गलथान कारभार गुरूवारी (दि.२६) त्यांच्या नजरेत पडला.
जिल्हास्थळावर केटीएस व बिजीडब्ल्यु रूग्णालय आहेत. अवघ्या जिल्ह्यासह लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील नागरिक उपचाराची आस धरून येथे येतात. मात्र येथे उपचाराच्या नावावर अक्षरश: रूग्णांचे हाल होत असल्याचे बोलणे वावगे ठरणार नाही. येथील रूग्णालयांची स्थिती बघावयाची झाल्यास रूग्णालय परिसरात सांडपाणी व घाण ही सामान्य बाब झाली आहे. बाई गंगाबाई रूग्णालयात तर रूग्णांच्या नातेवाईकांना घाण व चिखलातच आपले धुणे- भांडे करून त्याच वातावरणात वावरावे लागत असल्याचे चित्र आहे. तर केटीएस रूग्णालयात याहीपेक्षा बिकट स्थिती आहे. येथे तर स्वच्छतेचा दुष्काळच दिसून येतो. सफाई अभावी रूग्णालय परिसरात ठिकठिकाणी शिळे अन्न पडल्याचे दिसून येते. त्यावर माश्या व किटकांसह वहारांचा मुक्त संचार काही नवी गोष्ट नाही.
रूग्णालयात तळमजल्यावर पाण्याची मशीन लावण्यात आली आहे. मात्र मशीन बंद असल्याने नागरिकांना हातपंपाच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागते. रूग्णांना ने-आण करण्यासाठी लिफ्ट आहे मात्र ति ही नादुरूस्त. तर पहिल्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या मशीनजवळच शिळे अन्न पडलेले प्रतिनिधीला दिसले. एवढेच नव्हे तर मशीनच्या ट्रे मध्ये सुद्धा अन्न त्यातच इंजेक्शन व औषधं पडलेले असल्याने या मशीन मधून पाणी प्यावे कसे असा प्रश्न येथे उपस्थीत नागरिक एकमेकांना करीत होते. तर वॉर्डांतच उघड्यावर औषधांचे वेस्टेज व घाण ठेवलेल्या असल्याचेही बघावयास मिळाले. यावरून या रूग्णालयांत उपचार घेणारे रूग्ण कितपत सुरक्षीत आहेत यावरच प्रश्नचिन्ह लागते.
रूग्णालयातील फाटक्या परिस्थिती सारखीच येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्थिती आहे. अधिकांश पदे रिक्त असल्याने या रूग्णालयांना कर्मचाऱ्यांचेच ग्रहण लागले असल्याचे चित्र आहे. येथील केटीएस रूग्णालयातील रिक्त पदांची स्थिती बघितल्यास वर्ग-१ चे १८ पैकी १३ पद रिक्त आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी (चिकीत्सा), निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क), वैद्यकीय अधिकारी (भिषक), स्त्रीरोग प्रसुती तज्ञ, बालरोग, क्ष-किरण शास्त्रज्ञ, मनोविकृती चिकीत्सक, चर्मरोग, क्षयरोग, नेत्र शल्यचिकीत्सक, नाक/कान व घसा तज्ञांच्या पदांचा समावेश आहे. शिवाय वर्ग-२ ची २९ पैकी ६ पदे, वर्ग-३ ची २०३ पैकी ८२ पदे व वर्ग-४ ची १३५ पैकी ६९ पदे रिक्त आहेत. बीजीडब्ल्यू रूग्णालयात वर्ग-१ ची ५ पैकी २, वर्ग-२ ची १८ पैकी ३, वर्ग-३ ची ११२ पैकी ४१ व वर्ग-४ ची ५३ पैकी २५ पदे रिक्त आहेत.
तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयात वर्ग-३ ची २५ पैकी ४ व वर्ग- ४ ची १२ पैकी ४ पदे रिक्त आहेत. शिवाय १० ग्रामीण रूग्णालयातील आठ रूग्णालयांत वैद्यकीय अधिकारीच नाहीत. तर अन्य पदांचे सोडाच. एवढा गंभीर विषय असतानाही येथील अधिकारी वर्ग मात्र आपल्या मध्येच मस्त असल्याचे वातावरण आहे.
कर्मचाऱ्यांची चांगलीच अरेरावी
रूग्णालयांत बघितल्यास येथील नर्सेसचेच राज्य चालत असल्याचे चित्र आहे. नर्सेस रूग्ण व त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांसोबत नेहमीच तोऱ्यात वावरत असल्याचे दिसले. डाट-डपट ही क्षुल्लक बाब असून त्यांना काही माहिती विचारल्यास उलट त्यांच्याकडूनच समोरच्या व्यक्तीची झाडाझडती होत असल्याचे चित्र दिसले.