जलसंपत्ती असूनही सिंचनासाठी आसुसलेला
By Admin | Updated: April 24, 2015 01:40 IST2015-04-24T01:40:02+5:302015-04-24T01:40:02+5:30
भंडारा जिल्ह्यातून विभाजन झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यात १७४८ मामा तलाव अस्तित्वात होते.

जलसंपत्ती असूनही सिंचनासाठी आसुसलेला
कपिल केकत गोंदिया
भंडारा जिल्ह्यातून विभाजन झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यात १७४८ मामा तलाव अस्तित्वात होते. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने मात्र प्रत्यक्षात किती मामा तलाव जिल्ह्यात आले याची माहिती घेतली. त्यात १४२१ मामा तलाव प्रत्यक्षात असल्याची महिती आहे. एवढ्या मोठ्या संख्येत एखाद्या जिल्ह्यात मामा तलाव असणे साधारण बाब नसून यामुळेच १४२१ मामा तलाव असलेला गोंदिया हा ‘धनी’ जिल्हा म्हणून ओळखला जातो. तलाव असले तरी योग्य त्या देखभाल दुरूस्तीअभावी यातील काही तलावांना अखेरची घरघर लागली आहे.
मानवाला त्याच्या दैनंदिन उपयोगाशिवाय शेतीसाठी या मामा तलावांचा उपयोग होतो. विशेष म्हणजे भूगर्भातील जलस्तर वाढविण्यासाठी या मामा तलावांची उपयोगीता असून जल संपत्तीचे संग्रहण करण्याचे हे एक महत्वपूर्ण साधन आहे.
मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी उपाययोजना
आज मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी एमआरईजीएस अंतर्गत गाळ काढण्यासारखे काम केले जात आहेत. मात्र पाहिजे त्या प्रमाणात ही कामे होत नसल्याचीही वास्तवीकता आहे. याकरिता विभागाने शासनाकडे तलावांच्या दुरूस्तीसाठी विशेष निधीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे मामा तलावांचा हा मुद्दा लक्षात घेत शासनाने मधूकर किंमतकर यांच्या अध्यक्षतेत दोन-तीन वर्षांपूर्वी समिती गठीत केली होती. समितीने विदर्भातील मामा तलावांचा सखोल अभ्यास करून सुमारे शिफारसी शासनाकडे केल्या आहेत. याशिवाय जल संपत्ती वाढविण्यासाठी शासनाचे जलयुक्त शिवार अभियान प्रभावी ठरणार आहे.
सुमारे ३००-३५० वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी भविष्यातील पाणी टंचाईचे आकलन करून मामा तलाव तयार केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच गोंदिया व भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. पूर्वजांच्या पुण्याचे फलीत आजच्या पिढीला चाखायला मिळत असून त्यांच्या पुण्याईनेच जिल्ह्यात पाणी टंचाई होत नाही.
मात्र आजच्या पिढीला या जल संपत्तीचा अपव्यय टाळून जास्तीत जास्त सिंचन करण्याची गरज आहे. असे न झाल्यास येणारी पिढी मात्र पाण्यासाठी तडपणार यात शंका नाही. जल संपत्ती हीच खरी संपत्ती असून या संपत्तीचे वेळीच जतन करणे गरजेचे आहे.