मुसळधार पावसानंतरही तूट कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:07+5:30
ऑगस्ट महिन्यातील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प तसेच नदी-नाल्यांना पाणी आले. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातील पावसाने कहर केला असून मागील कित्येक वर्षांनंतर जिल्ह्यात पुराचा वेढा दिसला. सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतच्या या १० दिवसांत पावसाने जिल्ह्याला पार झोडपून काढले असून सर्वत्र पाणी-पाणी केले आहे.

मुसळधार पावसानंतरही तूट कायमच
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील पंधरवड्यापासून जिल्ह्याला पावसाने पार झोडपून काढले आहे. आजही जिल्ह्यात दमदार पाऊस बरसत असून पुराने वेढा घातला आहे. मागील कित्येक वर्षांनंतर हे चित्र बघावयास मिळत आहे. मात्र असे असतानाही आजही सरासरी १९५ मिमी पावसाची तूट कायम आहे. पावसाने कहर क रून सोडला असताना आता उरलेल्या २० दिवसांत मात्र ही तूट भरते काय याकडे लक्ष लागले आहे.
सुरूवातीच्या जून व जुलै महिन्यात पावसाने पाहिजे त्या प्रमाणात आपली हजेरी लावली नाही. परिणामी तेव्हापासूनच जिल्ह्यातील अपेक्षित व बरसलेल्या पावसात तूट दिसून आली. जून महिना कोरडाच गेला त्यानंतर जुलै महिन्यात काही पाऊस बरसला व तेव्हापासूनच हा फरक वाढू लागला.अशात आॅगस्ट महिन्यात वरूणराज जिल्ह्यावर मेहरबान झाले.याच महिन्यात जिल्हा सावरला.दमदार पावसाच्या हजेरीने शेतीची कामे उशीरा का होईना मात्र कशीतरी आटोपली. ऑगस्ट महिन्यातील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प तसेच नदी-नाल्यांना पाणी आले. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातील पावसाने कहर केला असून मागील कित्येक वर्षांनंतर जिल्ह्यात पुराचा वेढा दिसला. सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतच्या या १० दिवसांत पावसाने जिल्ह्याला पार झोडपून काढले असून सर्वत्र पाणी-पाणी केले आहे. असे असताना मात्र आजही अपेक्षित व बरसलेल्या पावसात सरासरी १९५ मिमी तूट दिसून येत आहे.जिल्ह्यात ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११७५ मिमी पाऊस बरसने अपेक्षित आहे. असे असताना मात्र जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९७७ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. म्हणजेच, आजही सरासरी १९५ मिमी पावसाची तूट कायम आहे.मागील वर्षी ९ सप्टेंबरपर्यंत सरासरी १०४५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली होती.
२० दिवसांत सरासरी ३५० मिमीची गरज
हवामान खात्यानुसार,जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत सरासरी १३२७ मिमी पाऊस बरसने अपेक्षित आहे. तर आतापर्यंत सरासरी ९७७ मीमी पाऊस बरसला आहे. आता पावसाचे २० दिवस शिल्लक असून यात कालावधीत सरासरी ३५० मिमी पावसाची गरज आहे.सध्या बरसत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात ३५० मिमीचे टार्गेट सर करण्यासाठी पाऊस बरसल्यास काय स्थिती राहणार याची कल्पना न केलेलीच बरी.