देवरी तालुका झाला कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 05:00 IST2022-02-21T05:00:00+5:302022-02-21T05:00:03+5:30
कोरोनावर हाती आलेल्या लसींमुळे तिसऱ्या लाटेला आपली मुळे मजबूत करता आली नाहीत. मात्र, प्रादुर्भाव वाढला व या लाटेतही कित्येकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. तब्बल दोन ते अडीच महिन्यांपासून प्रादुर्भाव असलेली तिसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. यामुळेच आता जिल्ह्यातही बाधितांची संख्या चांगलीच नियंत्रणात आली आहे.

देवरी तालुका झाला कोरोनामुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रस्ते वाहतूक मंत्रालयाने तब्बल दोन ते अडीच महिने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने विळख्यात अडकलेल्या जिल्ह्यात आता कोरोनाची तिसरी लाट ओसरताना दिसत आहे. यामुळे आता बाधितांची संख्या नियंत्रणात आली असून असे असतानाच देवरी तालुका रविवारी (दि.२०) कोरोनामुक्त झाला आहे. विशेष म्हणजे, आणखी ५ तालुक्यांत मोजकेच रूग्ण असल्याने ते सुद्धा कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत.
कोरोनाच्या २ लाटांनी होत्याचे नव्हते केले व कधीही न विसरता येणारी आठवण कायम केली आहे. त्यानंतर आता कोरोनाची तिसरी लाट आली असून डिसेंबर महिन्यापासून तिसऱ्या लाटेने आपला प्रादुर्भाव दाखविला आहे.
कोरोनावर हाती आलेल्या लसींमुळे तिसऱ्या लाटेला आपली मुळे मजबूत करता आली नाहीत. मात्र, प्रादुर्भाव वाढला व या लाटेतही कित्येकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. तब्बल दोन ते अडीच महिन्यांपासून प्रादुर्भाव असलेली तिसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. यामुळेच आता जिल्ह्यातही बाधितांची संख्या चांगलीच नियंत्रणात आली आहे.
जिल्ह्यात रविवारची (दि.२०) स्थिती बघितल्यास फक्त २ बाधितांची भर पडली असून १४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर जिल्ह्यात फक्त ४८ ॲक्टिव्ह रूग्ण आहेत. मात्र गूडन्यूज अशी की, जिल्ह्यातील देवरी तालुका रविवारी कोरोनामुक्त झाला. विशेष म्हणजे, आता तिरोडा तालुक्यात २, गोरेगाव २, आमगाव ३, सालेकसा २ व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात फक्त १ ॲक्टिव्ह रूग्ण उरला आहे. म्हणजेच, हे तालुकेसुद्धा आता कोरोनामुक्तीच्या वाटेवर दिसून येत आहेत.
गोंदिया तालुक्यात सर्वाधिक रुग्ण
- कोरोनाच्या सुरूवातीपासूनच गोंदिया तालुका हॉटस्पॉट राहिला असून, तिन्ही लाटांमध्ये सर्वात जास्त प्रादुर्भाव व जीवितहानीसुद्धा गोंदिया तालुक्यातच झाली आहे. त्यात अद्याप तालुक्यात सर्वाधिक २८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर सडक-अर्जुनी तालुक्यात १० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामुळे या तालुक्यांना थोडा वेळ असला तरी परिस्थिती नियंत्रणात राहिल्यास काही दिवसांनी जिल्हा परत एकदा कोरोनामुक्त होणार, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
केवळ तीन बाधित रुग्णालयात
- देशात मोठ्या प्रमाणात झालेले लसीकरण कोरोनाला आपला डाव साधण्यात अडचणीचे ठरले व तिसरी लाट फक्त सर्दी, खोकला आणि तापावरच राहिली. यातही बाधित घरीच औषध घेऊन बरे झाल्याने त्यांना भरती करण्याची गरज पडली नाही. हेच कारण आहे की, रविवारी जिल्ह्यात ४८ ॲक्टिव्ह रुग्ण असले तरीही फक्त तीन रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.