डेंग्यू पाय पसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 20:58 IST2017-08-27T20:57:35+5:302017-08-27T20:58:02+5:30

Dengue is spreading legs | डेंग्यू पाय पसरतोय

डेंग्यू पाय पसरतोय

ठळक मुद्देआढळलेत रूग्ण : शहरवासीयांत दहशतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरासह लगतच्या मुर्री या गावात डेंग्यूचे रूग्ण आढळले आहेत. यातील एकाला शहरातीलच खासगी रूग्णालयात तर दुसºयाला नागपूर येथे खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे शहर व ग्राम मुर्रीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिवताप विभागाकडून मागील काही वर्षांत जिल्ह्यात डेंग्यूचा नायनाट करण्यात आल्याचे सांगीतले जात आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, जिल्ह्यात डेंग्यू पेक्षा मलेरिया जास्त धोकादायक आहे. मात्र त्यांचा हा दावा फोल ठरत असल्याचे म्हणता येईल.
कारण, शहरातील छोटा गोंदिया परिसरातील रहिवासी शितल उपेंद्र शनवारे (२८) व लगतच्या ग्राम मुर्री येथील रहिवासी कैवल्य पंकज लिचडे (५) यांना डेंग्यूची लागण झाल्याची शंका आहे. यातील शितल शनवारे यांना शुक्रवारी ताप आल्याने येथील डॉ. गिरी यांच्याकडे तपासणी केली असता त्यांच्या प्लेटलेट्स कमी झाल्याचे कळले. यामुळे त्यांना भर्ती करण्यात आले आहे.
तर कैवल्य लिचडे याला २२ तारखेला ताप आला व त्याची डॉ. सावजी यांच्याकडे तपासणी केली असता प्लेटलेट्स कमी झाल्याने त्याला २३ तारखेला नागपूरच्या डॉ. देवपुजारी यांच्याकडे भरती करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, याशिवाय आणखी काही रूग्ण आढळल्याची माहिती आहे. ही परिस्थिती बघता शहर व लगतच्या मुर्री या गावात डेंग्यू आपले पाय पसरत असल्याचे म्हणता येईल.
नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष
डेंग्यू आपले पाय पसरत असल्याचे दिसून येत असून ग्रामीण भागात हिवताप विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र शहरात नगर परिषद प्रशासनाकडून काहीच केले जात नसल्याचेही दिसून येत आहे. विशेष म्हणजे, नगर परिषदेला हिवताप विभागाकडून डासनाशक औषध फवारणीसाठी दिली जात होती. यंदा मात्र हिवताप विभागाकडेच कमी प्रमाणात पुरवठा झाल्याने नगर परिषदेला त्यांनी औषध दिली नाही. शिवाय नगर परिषदेकडे आजघडीला काहीच औषध उपलब्ध नाहीत. यामुळे नगर परिषदेचा कारभार किती तत्परतेने चालत आहे याची प्रचिती येते. नगर परिषदेने औषध खरेदीसाठी निवीदा काढली होती. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती आहे. यातून नगर परिषदेचा दुर्लक्षीत कारभार पुढे येतो.
मुर्रीत सुरू झाल्या उपाययोजना
डेंग्यूचा रूग्ण आढळल्याची माहिती मिळताच जिल्हा हिवताप विभागाकडून मुर्रीत फॉगींग व नाल्यांत फवारणीचे काम सुरू करण्यात आले. शिवाय तापाचे रूग्ण शोधून त्यांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले आहेत. डेंग्यू पसरू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचे प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. टेंभूर्णे यांनी सांगीतले.

Web Title: Dengue is spreading legs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.