कोटरा गावात डेंग्यूसदृश आजाराचे थैमान
By Admin | Updated: August 9, 2014 00:54 IST2014-08-09T00:54:40+5:302014-08-09T00:54:40+5:30
सालेकसा तालुक्याच्या कोटरा येथे डेंग्यू या आजाराने थैमान घातल्याने त्या गावातील २६२ जणांना तापाची लागण झाली. यातील बहुतांश व्यक्ती डेंग्यूचे संशयीत रूग्ण आहेत.

कोटरा गावात डेंग्यूसदृश आजाराचे थैमान
गोंदिया : सालेकसा तालुक्याच्या कोटरा येथे डेंग्यू या आजाराने थैमान घातल्याने त्या गावातील २६२ जणांना तापाची लागण झाली. यातील बहुतांश व्यक्ती डेंग्यूचे संशयीत रूग्ण आहेत. या गावातील बहुतांश लोकांना उपचारासाठी केटीएस जिल्हा सामन्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची योग्य देखरेख होत नसल्याचा आरोप रूग्ण व त्यांचे नातेवाईक करीत आहेत.
जिल्हा वनाच्छादीत असल्याने जिल्ह्यातील अनेक गावात डेंग्यूने पाय पसरले आहे. सर्वाधिक डेंग्यूचा पसार सालेकसा तालुक्याच्या कोटरा या गावात आहे. यंदाचा पावसाळा सुरू झाला. अन् डे़ंग्यूने हातपाय पसरणे सुरू केले. कोटरा या गावातील २६२ जाणांना ताप आला. काहींनी शासकीय रूग्णालयात उपचार घेतला तर काहींनी खासगी डॉक्टरांकडे धाव घेतली. यातील अनेकांना डेंगञयूची लागण झाल्याचे समजते. गोंदिया जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातल्यामुळे १८ जणांना केटीएस जिलञहा सामन्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्या कोटरा येथील विरेंद्र गोविंदराव वानखेडे (१९), मदन तुरकर (७५), शैलेश शहारे (१९), इजाज अहमद (२६), हुसेंद्र भावे (२१) कृणाल चौरे (१७) परमानंद बोहरे (२९), शकुंतला श्रीराम मेश्राम (२५), संगीता शालीकराम चुटे (२१), मीनाकुमार मिलींद वैद्य (२२), किरण देवराज हत्तीमारे (१८), स्वाती देवराज हत्ताीमारे (१४) झुलन गजू मेश्राम (४५), रेणुका केशवराव साखरे (१८), पन्नालाल संतोष कोटांगले (३२), प्रतिक्षा अशोक कोटांगले (१३), नितेश रहांगडाले (१७) रा. सतोना व गोरेगाव तालुक्याच्या मोहाळी येथील बिरनबाई मोडकू पालेवार (६०) असे उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांची नावे आहेत. मागील आठवडाभरापासून हे उपचारासाठी दाखल झाले. मात्र उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात हलगर्जी होत असल्याची तक्रार रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
डेंग्यूचे जिल्ह्यात थैमान असताना आरोगञय यंत्रणा उदासिन आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रवी धकाते यांचे जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे दुर्लक्ष आहे. त्यांनी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाचा पदभार निवासी वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. अनिल परियाल यांच्यावर सोपवून ते नागपूर, पुणे मुंबईचे दौरे करतात. डॉ.परियाल हे या रूग्णालयाला सांभाळण्यात अपयशी ठरल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांचा अरेरावीपणा सुरू झाला. परिणामी कर्मचारी रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मारहाण करणे सुरू केले आहे.
गुरूवारी रूग्णांना मारहाण केल्यामुळे डेंग्यूने ग्रस्त असलेली एक महिला रूग्णालयातून घरी गेली. आमगाव तालुक्याच्या करंजी येथील कौशल्या तरोणे व आणखी एका वृध्द महिलेला काही दूर अंतरावर फरफटत नेल्याचे रूग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. स्वच्छता करण्यासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रमुख म्हणजे मुकडदम ह्या पदावर एकता मोगरे नावाची महिला काम करीत आहे. त्यांनी रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना गुरूवारी मारहाण झाली. (तालुका प्रतिनिधी)