जिल्ह्यातील सहा गावांत डेंग्यूचे थैमान
By Admin | Updated: July 31, 2014 00:05 IST2014-07-31T00:05:43+5:302014-07-31T00:05:43+5:30
जिल्हा जंगलाने आच्छादलेला असल्याने दरवर्षीच जिल्ह्यात डेंग्यू पाय पसरतो. मात्र आरोग्य विभाग याकडे उदासीनता दाखवित असल्यामुळे जिल्ह्यात डेंग्यू झपाट्याने पाय पसरत आहे.

जिल्ह्यातील सहा गावांत डेंग्यूचे थैमान
शासकीय आकडा अत्यल्प : ३८ जणांचे नमूने तपासणीसाठी पाठविले
गोंदिया : जिल्हा जंगलाने आच्छादलेला असल्याने दरवर्षीच जिल्ह्यात डेंग्यू पाय पसरतो. मात्र आरोग्य विभाग याकडे उदासीनता दाखवित असल्यामुळे जिल्ह्यात डेंग्यू झपाट्याने पाय पसरत आहे. जिल्ह्यातील राजोली, ताडगाव, सिरेगावबांध, कोरंभी, कोटरा व दवनीवाडा या सहा गावांत डेंग्यूने थैमान घातले आहे. परंतु शासकीय आकडा अत्यल्प दाखवत आहे.
पावसाळा सुरू होताच डेंग्यूने हातपाय पसरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील चार गावात डेंग्यूने थैमान घातले. राजोली येथील अनेक लोक आजारी पडले असून त्यांना डेंग्यू असल्याचे लक्षात आले. मात्र हिवताप कार्यालय या गावातील फक्त पाच रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती देत आहे.
ताडगाव येथील अनेकांना डेंग्यूची लागण झाली. मात्र दोनच रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. सिरेगावबांध येथेही हिच स्थिती आहे. मात्र येथीलही दोनच रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. तर कोरंभी येथील पाच जणांचे रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. परंतु त्यांच्या नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला नाही, असे हिवताप कार्यालयाचे म्हणणे आहे.
सालेकसा तालुक्याच्या कोटरा येथे डेंग्यूने थैमान घातल्यामुळे तेथे शिबिरही लावण्यात आले होते. या ठिकाणातील पाच लोकांचे रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. कोटरा येथे चार जणांना डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे तेथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक अनंतवार यांनी सांगितले होते. परंतु हिवताप कार्यालय सालेकसा तालुक्यात एकही डेंग्यूचा पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याचे सांगून आपल्या उदासिनतेची साक्ष देत आहे.
गोंदिया तालुक्याच्या दवनीवाडा येथे मागील आठवड्या भरापासून डेंग्यूने थैमान घातले आहे. या गावातील लिलावती सुरजलाल माहुले (५८) रा. दवनीवाडा या महिलेचा डेंग्यूने नागपूर येथे उपचार घेताना मृत्यू झाला.
व्हीकेश यादोराव भोयर (२२), अखिलेश लिल्हारे (२७) व यशोदा नागपूरे (५६) यांना डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु दवनीवाडा येथील सात लोकांच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अद्याप डेंग्यू आहे किंवा नाही ही बाब स्पष्ट झाली नाही, असे हिवताप कार्यालयातील कर्मचारी कुंभरे यांनी सांगितले.
डेंग्यूने लिलावती माहुले यांचा मृत्यू झाला. मात्र याची नोंद जिल्हा हिवताप कार्यालयात नाही. (तालुका प्रतिनिधी)