तलाठी कार्यालय सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:33 IST2021-01-16T04:33:47+5:302021-01-16T04:33:47+5:30
किसान सन्मान योजनेपासून वंचित सडक अर्जुनी : सरकारने कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार ...

तलाठी कार्यालय सुरू करण्याची मागणी
किसान सन्मान योजनेपासून वंचित
सडक अर्जुनी : सरकारने कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला. या योजनेतून अनेकांना लाभ मिळाला. मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांना वारंवार शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही योजनेचा लाभ मिळाला नाही.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता
गोरेगाव : शहरातील उपमुख्य रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यांमध्ये भरण घालण्यात आले असले तरी ते साहित्य रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होत आहेत. येण्या- जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
विडी उद्योगांवर
उतरती कळा
गोंदिया : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात एकेकाळी मोठ्या उद्योगांना आव्हान देणाऱ्या बिडी उद्योगावर उतरती कळा लागली आहे. हे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहे. हजारो विडी कामगारांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. जिल्ह्यातील तेंदुपत्ता उद्योगाला वाव मिळाल्यास या मजुरांच्या पोटापाण्याची समस्या सुटणार आहे.
रस्ता बांधकामाच्या चौकशीची मागणी
अर्जुनी-मोरगाव : परिसरात निम्याहून अधिक रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत डांबरीकरण करण्यात आले आहे. बहुतांश डांबरीकरण रस्त्यावर महिनाभरात खड्डे पडली आहेत. या रस्त्यांना खड्ड्यात पॅचेस लावले जात आहेत. अल्पकालावधीत रस्त्यावर खड्डे पडल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत. या संपूर्ण रस्ते बांधकामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
सरलप्रणाली नोंदणीला मुदतवाढ द्या
केशोरी : राज्याच्या शिक्षण विभागाने पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी शासकीय लाभांचा इतर कोणालाही फायदा घेता येऊ नये यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची नोंद सरलप्रणालीद्वारे घेण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. मात्र कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची सरलप्रणालीमध्ये नाव नोंदणी थांबली आहे. सरलप्रणाली नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी शाळा मुख्याध्यापकांनी केली आहे.
कोहमारा येथे तलाठी कार्यालय सुरू करा
सडक-अर्जुनी : महसूल विभागाने नवीन कोहमारा सांझा क्रमांक २६ निर्माण केलेला आहे. मात्र कोहमारा येथे तलाठी कार्यालयच नाही. ते कार्यालय चिखली येथे आहे. त्यामुळे कोहमारा, नैनपूर, डुग्गीपार, कोलारगाव, कोसबी अशा पाच गावांतील नागरिकांना चिखली येथे जावे लागत आहे. येथे तलाठी कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली, पण अजूनही ही मागणी मार्गी लागली नाही.
वडेगाव मार्गावर खडीकरणाची मागणी
सडक अर्जुनी : तालुक्यातील केसलवाडा-वडेगाव मार्गावर मागील पाच वर्षांपासून खडीकरण न झाल्याने नागरिकांना ये -जा करण्यासाठी फारच त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे खडीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
.....
विषाणूजन्य आजाराची साथ
गोंदिया : हवामानातील बदलाने परिसरात विषाणूजन्य आजाराची साथ पसरत आहे. यात लहान बालके व म्हातारे जास्त आहे. रुग्णालयात गर्दी वाढत असून खासगी डॉक्टर व मेडिकल मालकांची चांदी होत आहे.
अर्धवट बांधकामाचा बसतोय फटका
गोरेगाव : गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावर फाटक नसलेल्या ठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे़. अपुऱ्या मनुष्यबळ अभावी रेल्वेमार्गावर फाटक उभारण्यास अडचणी होत आहे.
रेती साठ्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील रेती घाट परिसरात व शहरातील चंद्रभागा नाका, चुरडी, शाल्व्हीन बार मागे, अन्य ठिकाणी शहरात रेतीचा मोठा साठा पडला असतो.
उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता
गोंदिया : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अतिक्रमणाची समस्या वाढली असून, रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे वाहने बाहेर काढणे कठीण होत आहे.