संततधार नंतरही तूट कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:00 IST2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:00:59+5:30
पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले व प्रकल्पांना पाणी आले असून जिल्हा पाणीदार झाला आहे. असे असतानाच मात्र अद्याप जिल्ह्यात पावसाची तूट कायम आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९११.३ सरसरी पाऊस अपेक्षित असतानाच ६३५.७५ सरासरी पाऊस पडला आहे. म्हणजेच, आजही २७५.५६ सरासरीची तूट कायम असून पावसाची गरज आहे.

संततधार नंतरही तूट कायमच
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील आठवड्याभरापासून संततधार बरसत असलेल्या पावसाने अवघ्या जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले व प्रकल्पांना पाणी आले असून जिल्हा पाणीदार झाला आहे. असे असतानाच मात्र अद्याप जिल्ह्यात पावसाची तूट कायम आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९११.३ सरसरी पाऊस अपेक्षित असतानाच ६३५.७५ सरासरी पाऊस पडला आहे. म्हणजेच, आजही २७५.५६ सरासरीची तूट कायम असून पावसाची गरज आहे.
जिल्ह्यात जून व जुलै या सुरूवातीच्या २ महिन्यांत थोडाफार पाऊस बरसला व तेव्हापासूनच पावसाची तूट दिसत आहे. पावसाअभावी यंदा शेतीची कामेही रखडली होती व त्यामुळे रोवणीही लांबली.
मात्र आॅगस्ट महिन्यात पावसाने जोर धरला व त्यातही मागील आठवडाभरापासून बरसत असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थितीही निर्माण झाली होती. शिवाय पावसामुळे शेतकरीही सुखावला आहे. असे असतानाच मात्र जिल्ह्यात पाहिजे तेवढा पाऊस पडलेला नसून त्यामुळे तूट असल्याचेही तेवढेच खरे आहे.
जिल्ह्यात सोमवारपर्यंत (दि.१७) ९११.३ सरासरी पाऊस अपेक्षित आहे. मात्र अद्याप फक्त ६३५.७५ एवढा सरासरी पाऊस बरसल्याची नोंद आहे. म्हणजेच, आतापर्यंत २७५.५६ एवढ्या सरासरी पावसाची तूट दिसून येत आहे. आता एका दिवसावर पोळा आला असून ‘पोळा आणि पाणी झाला भोळा’ असे म्हटले जाते. यावरून आता ही तूट भरून काढण्यासाठी जिल्ह्यात दमदार पावसाची गरज आहे.
सर्वाधिक पाऊस गोरेगाव तालुक्यात
जिल्ह्यात आतापर्यंत ६३५.७४ एवढ्या सरासरी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. यात सर्वाधिक पाऊस गोरेगाव तालुक्यात २७०२.३५ मीमी पडला असून त्याची सरासरी ९००.७८ एवढी आहे. तर गोंदिया तालुक्यात ३७२८.३० मीमी (५३२.६१), तिरोडा तालुक्यात २९६७.७७ मीमी. (५९३.५५), अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २८६२.९० मीमी. (५७२.५८), देवरी तालुक्यात १५६१.०७ मीमी (५२०.३६), आमगाव तालुक्यात २९५२.३० मीमी. (७३८.०८), सालेकसा तालुक्यात १५५१.५० मीमी. (५१७.१७) तर सडक-अर्जुनी तालुक्यात २६५३.३८ मीमी. (८८४.४६) पाऊस बरसल्याची नोंद घेण्यात आली आहे.