वैनगंगेच्या पाणी पातळीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:05+5:30
तिरोडा तालुक्यातील किडंगीपार ते ढिवरटोला, सावरा ते पिपरिया, घाटकुरोडा ते मुंडीकोटा, कवलेवाडा ते मरारटोला या गावांचा संपर्क गोंदिया तालुक्यातील कासा, पुजारीटोला व ब्राह्मणटोला या गावात वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती.

वैनगंगेच्या पाणी पातळीत घट
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील १० गावांना पुराचा वेढा निर्माण झाला होता. यामुळे किडंगीपार आणि किन्ही येथील १०५ नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने सोमवारी सुरक्षीत स्थळी हलविले होते. मंगळवारी (दि.१०) वैनगंगा नदीच्या पातळीत ६ फुटाने घट झाल्याने जनजीवन पूर्वपदावर आले.
तिरोडा तालुक्यातील किडंगीपार ते ढिवरटोला, सावरा ते पिपरिया, घाटकुरोडा ते मुंडीकोटा, कवलेवाडा ते मरारटोला या गावांचा संपर्क गोंदिया तालुक्यातील कासा, पुजारीटोला व ब्राह्मणटोला या गावात वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे किन्ही येथील १०६ गावकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सुरक्षीत स्थळी हलविले होते. या नागरिकांची व्यवस्था गोंडमोहाडी येथील लक्ष्मणराव मानकर आदिवासी निवासी आश्रम शाळेत करण्यात आली होती. या नागरिकांच्या जेवण आणि राहण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली होती.तसेच जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी येथे भेट देऊन सोयी सुविधांचा आढावा घेतला.
सोमवारी वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदी पात्रातून रेती काढतांना चार जण पुरात अडकले होते. वैनगंगेच्या काठावर असलेल्या किन्ही येथे पुरात अडकलेल्या चार जणांना जिल्हा प्रशासनाने तत्परता दाखवित रेस्क्यू आॅपरेशन राबवून सुखरुप वाचविले. यात हमीरपूर येथील दीपलसिंह मोहनसिंह गौर, दौरया येथील संदीप महेंद्र यादव, बरेली येथील सुनीलसिंह बिरजलालसिंह चव्हाण व मुरादाबाद येथील रूहमसिंह देवीराम सैनी (३०) हे होते. हे चौघेही जेसीबी काढत होते. तेथे चारही बाजूने पाऊस आला.त्यावेळी ते चारही जेसीबीवर बसले होते. जिल्हाधिकारी कार्यालयच्या शोध व बचाव चमूने रेस्क्यू टिमने सुरक्षित बाहेर काढले. किशोर टेंभूर्णे, राजकुमार बोपचे,जसवंत रहांगडाले,धीरज दुबे, रवींद्र भांडारकर, चुन्नीलाल मुटकुरे, इंद्रकुमार बिसेन,अनिल नागपुरे, चंद्रशेखर बिसेन, मुरलीधर मुदोडकर यांनी रेस्क्यू आॅपरेशन राबविले.या अभियानात पोलीस कर्मचारी सुभाष कश्यप, नरेश उईके, इमरान सैयद, संदीप कराडे, रूपेंद्र गौतम, गिरधारी पतेह, जबरान चिखलोंढे, बाबरे,गजभिये व जावेद पठान यांचा समावेश आहे.
पुजारीटोला धरणाचे दरवाजे बंद
सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ६ दरवाजे एक फुटाने तर कालीसराड धरणाचे २ दरवाजे आणि संजय सरोवर धरणाचे २ दरवाजे मंगळवारी सकाळी उघडण्यात आले होते.या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र सायंकाळी ७ वाजता पुजारीटोला धरणाचे ६ दरवाजे बंद करण्यात आले.
शहरात जोरदार पावसाची हजेरी
दोन दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शहरात जोरदार हजेरी लावली होती. यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. या पावसाचा फटका गणेशोत्सव मंडळांना सुध्दा काही प्रमाणात बसला.