गोंदिया : २५ मे पासून सुरू असलेला नवतपा कसा तरी सरला असून यानंतर तापमानात घट झाली आहे. असे असतानाही मात्र उकाडा अद्याप कायम असून जीव आताही कासावीस होत आहे. तापमानात घट झाली तरीही उन्हाची तीव्रता काही कमी होण्याचे नाव घेत नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून उकाड्यापासून मुक्तता मिळावी यासाठी नागरिक आता पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. यंदाच्या उन्हाळ्य़ात मार्च व एप्रिल महिन्यात थोडी फार पावसाची रिमझिम झाली. यामुळे काही दिवस तापमान कमी जाणवले मात्र त्यानंतर रविराज चांगलेच तापले व आता काही शांत होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच जिल्ह्याचा पार ४२ ते ४३ डिग्रीच्या घरात गेला होता. एवढय़ा तापमानात जीव कासावीस होऊ लागल्याने सर्वांनाच एक-एक दिवस जड होऊ लागला. त्यात उन्हाळ्याचा खरा महिना म्हणजे मे महिना असतो. मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच सूर्यदेवाने आपला कोप दाखविला. त्यात महिन्याच्या शेवटी २५ मे पासून नवतपा सुरू झाला व तापमानाने हद करून टाकली. यंदाच्या नवतपात तर जिल्ह्यातील तापमानाचा पारा चांगलाच वर चढला. ४५ डिग्रीच्या घरात गेलेल्या तापमानाने जिल्हावासी होरपळून गेले होते. उन्हाला बघता शहरात अघोषित संचारबंदीसदृश स्थिती दुपारच्या वेळी बघावयास मिळत होती. नवतपाचे नऊ दिवस अशा प्रकारेच चांगले तापले व उष्णतेची लाटच अवघ्या विदर्भात पसरल्याचे दिसून येऊ लागले. आता नवतपा संपला असून त्यानुसार सूर्यदेवाचा कोपसुद्धा काही प्रमाणात कमी झाल्याचे बघावयास मिळत आहे. नवतपा संपताच उष्णतेची लाट कमी झाल्याचे दिसून येत असून त्यामुळे तापमानातही घट झाली आहे. नवतपात रात्रीच्या वेळी अंगाला चटके लागायचे व उष्ण वारे वाहत असल्याचा अनुभव यंदा मिळाला. मात्र नवतपा सरताच वातावरण बदलले. रात्रीला थोड्या फार प्रमाणात थंड वारे वाहत आहेत. असे असताना मात्र दिवस तसाच कठीण जात आहे. तापमानात घट झाली असली तरीही उकाडा काही कमी झालेला नाही. यामुळे नागरिकांची पंचाईत अद्याप संपलेली नाही. उन्हाचे चटके आजही लागत असल्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. कित्येक तर दिवसा बाहेर निघणे टाळत आहेत. यामुळे दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदी दिसून येते. सायंकाळी कसे तरी नागरिक आपले दिवसभराचे काम आटोपायला निघतात. आता लोकांची सहनशीलता संपली असून कधी पाऊस पडतो व या उकाड्यापासून मुक्तता मिळते याची वाट सर्वच बघत आहेत. (शहर प्रतिनिधी)
तापमानात घट - उकाडा मात्र कायम
By admin | Updated: June 4, 2014 00:10 IST