शाळा बंद करण्याचा निर्णय प्रलंबित
By Admin | Updated: July 16, 2014 00:14 IST2014-07-16T00:14:55+5:302014-07-16T00:14:55+5:30
नगर परिषदेची आमसभा १४ जुलै रोजी नगर परिषद सभागृहात पार पडली. या सभेत विषय-३२ अंतर्गत नगर परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या २० पेक्षा कमी

शाळा बंद करण्याचा निर्णय प्रलंबित
कॉन्व्हेंटचा प्रस्ताव : नगर परिषदेच्या आमसभेत विषय
गोंदिया : नगर परिषदेची आमसभा १४ जुलै रोजी नगर परिषद सभागृहात पार पडली. या सभेत विषय-३२ अंतर्गत नगर परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या २० पेक्षा कमी असल्यास त्यांना बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. परंतु सभेत या विषयावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र या शाळांच्या ठिकाणी कॉन्व्हेंट सुरू करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.
ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे त्यात मराठी सिव्हील लाईन प्राथमिक शाळा ( विद्यार्थी संख्या-६), मराठी माताटोली प्राथमिक शाळा (विद्यार्थी संख्या-१२), हिंदी टाऊन शाळा (विद्यार्थी संख्या-७), हिंदी माताटोली शाळा (विद्यार्थी संख्या- १०), हिंदी मालविय शाळा (विद्यार्थी संख्या-१५) यांचा समावेश आहे.
मराठी सिव्हील लाईन शाळेच्या विद्यार्थ्यांना मराठी इंजिन शेड शाळा, मराठी माताटोली शाळेच्या विद्यार्थ्यांना मराठी डॉ. आंबेडकर विद्यालय, हिंदी टाऊन शाळा, हिंदी माताटोली शाळा व हिंदी मालविय शाळेच्या विद्यार्थ्यांना हिंदी मालविय विद्यालयात स्थानांतरीत करण्याचा प्रस्ताव होता. आमसभे सदस्यांनी विरोध करताना म्हटले की, हा निर्णय नेहमीसाठी शाळांना कुलूप लावण्याचा निर्णय सिद्ध होवू शकतो. ज्या शाळांना मराठी किंवा हिंदी भाषेचे विद्यार्थी मिळत नाही, तेथे कॉन्व्हेंट सुरू करण्यात आले तर विद्यार्थी मिळतील किंवा नाही, हा प्रश्न कायम राहणार आहे. परंतु एक बाब स्पष्ट आहे की, हा निर्णय जे विद्यार्थी नगर परिषदेच्या शाळांत अध्ययन करतात त्यांच्यासाठी समस्यादायक ठरेल. मराठी सिव्हील लाईन शाळेच्या विद्यार्थ्यांना हिंदी इंजिन शेड शाळा खूप दूर होईल. हिंदी टाऊन शाळेच्या विद्यार्थ्यांना मालविय शाळासुद्धा दूर ठरेल.
या आमसभेत कोणतेही वादग्रस्त विषय ठेवण्यात आले नाही. आमसभेत नगराध्यक्ष सुशीला भालेराव, मुख्याधिकारी सुमंत मोरे, सभापती राकेश ठाकूर, खालीद पठान, कोमल आहूजा, शारदा हालानी उपस्थित होते. सत्तापक्षाकडून पंकज यादव, मनोहर वालदे, राकेश ठाकूर व विपक्षाकडून घनश्याम पानतावने, बंटी पंचबुद्धे, प्रमिला सिंद्रामे, कशिश जायस्वाल यांनी चर्चेत भाग घेतला.