जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्युसत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:28 IST2021-04-10T04:28:38+5:302021-04-10T04:28:38+5:30
गोंदिया : झपाट्याने वाढत असलेल्या बाधितांच्या संख्येने अवघा जिल्हा हेलावून गेला असतानाच सातत्याने होत असलेली मृत्यूसंख्यावाढ मात्र सर्वांनाच दहशतीत ...

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्युसत्र सुरूच
गोंदिया : झपाट्याने वाढत असलेल्या बाधितांच्या संख्येने अवघा जिल्हा हेलावून गेला असतानाच सातत्याने होत असलेली मृत्यूसंख्यावाढ मात्र सर्वांनाच दहशतीत आणत आहे. जिल्ह्यातील मागील ३ दिवसांपासून सातत्याने कोरोनाबाधितांचा मृत्यू होत असून, एप्रिल महिन्यातील या ९ दिवसांत तब्बल १७ रुग्णांचा कोरोनाने जीव घेतला आहे.
मध्यंतरी नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा एकदा उफाळून आला आहे. यंदा त्याचा प्रादुर्भाव आणखी अधिक वेगाने होत असल्याने जिल्ह्यात बघता-बघता बाधितांची संख्या १९,४५९ इतकी झाली आहे, तर यामध्ये ३,४३४ रुग्ण क्रियाशील आहेत. बाधितांची वाढती संख्या बघता जिल्हावासीयांत आता कोरोनाला घेऊन पुन्हा एकदा घबराट निर्माण झाली आहे. मात्र, त्यात अधिकची भर घालणारी बाब म्हणजे, बाधितांच्या संख्येपाठोपाठ आता मृतांची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत (दि.९) कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २११ इतकी झाली आहे. मात्र, मार्च महिन्यात जेथे ६ रुग्णांची कोरोनामुळे जीव गेल्याची नोंद आहे, तेथेच एप्रिल महिन्यातील या ९ दिवसांत तब्बल १७ रुग्णांचा कोरोनाने जीव घेतला आहे. एकंदर कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अधिक वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे.
------------------------------
मृतांंमध्ये गोंदिया तालुक्यातील १२० रुग्ण
जिल्ह्यात जेथे आतापर्यंत २११ कोरोना रुग्णांचा जीव गेला आहे. तेथेच फक्त गोंदिया तालुक्यातील १२० रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, सुरुवातीपासूनच गोंदिया शहर व तालुका कोरोना हॉट स्पॉट ठरले आहे. परिणामी, कोरोनाबाधित व मृतांची येथेच सर्वाधिक संख्या राहिली आहे. त्यानंतरही गोंदिया शहर व तालुक्यातील जनतेत मात्र एवढे सर्व बघूनही काहीच गांभीर्य नसल्याचे त्यांच्या वर्तणुकीतून दिसून येत आहे.
--------------------------------
कोरोनाबाधित मृतांचा तालुकानिहाय तक्ता
तालुका मृत्यू
गोंदिया १२०
तिरोडा २७
गोरेगाव ०९
आमगाव १३
सालेकसा ०५
देवरी १०
सडक-अर्जुनी ०६
अर्जुनी-मोरगाव ११
इतर राज्य व जिल्हा १०
एकूण २११