पुतळी ते मुंडीपार मार्गावर जीवघेणा खड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 23:38 IST2018-07-27T23:38:07+5:302018-07-27T23:38:35+5:30
सडक-अर्जुनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पुतळी ते मुंडीपार मार्गावर रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा पडला आहे. देवरीला ये-जा करण्यासाठी याच मार्गाचा सर्वाधिक वापर केला जातो.

पुतळी ते मुंडीपार मार्गावर जीवघेणा खड्डा
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पुतळी ते मुंडीपार मार्गावर रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा पडला आहे. देवरीला ये-जा करण्यासाठी याच मार्गाचा सर्वाधिक वापर केला जातो. मात्र रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला असल्याने या ठिकाणी अपघात होण्याचीे शक्यता नाकारता येत नाही.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील सर्व मार्ग खड्डे मुक्त करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्यमार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. तसेच किती खड्डे बुजविले याची आकडेवारी सुध्दा सादर केली होती. मात्र यानंतरही रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने या विभागाने कुठले खड्डे बुजविले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुतळी गावावरुन अडीच किमी तसेच मुंडीपारवरुन दीड किमी अंतरावर डांबरीकरण मार्गाला मधोमध खड्डा पडला आहे.
याच खड्ड्याच्या आजूबाजूला अनेक छोटे-छोटे खड्डे पडत आहेत. हा मार्ग पूर्णत: जंगलातून गेला आहे. रस्त्याच्याकडेला वाहन नेण्यासाठी जागाच नसल्याने वाहन चालकाचा तोल जावून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल असल्याने या मार्गावर नेहमीच वन्यप्राण्यांची वर्दळ असते.
हा रस्ता देवरीवरुन ये-जा करण्यासाठी शार्टकट असल्यामुळे वाहन-चालक याच मार्गाचा अवलंब करतात. यामुळे पाच किमीचे अंतर सुध्दा कमी होते. त्यामुळे वाहन चालक याच मार्गाचा सर्वाधिक वापर करतात.
अल्पावधित उखडला रस्ता
पुतळी ते मुंडीपार या मार्गाचे डांबरीकरण काही महिन्यापूर्वीच करण्यात आले होते. मात्र अल्पावधीतच हा रस्ता उखडला असून रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामावर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेवून रस्त्याची दुरूस्ती करण्याची गरज आहे.
किती खड्डे बुजविले याची माहिती नाही
सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या अंतर्गत येणाºया कोणत्या मार्गावरील किती खड्डे बुजविले याची माहिती या विभागाच्या अधिकाºयांना विचारली असती. त्यांच्याकडे ही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने नेमके किती खड्डे बुजविले यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.