ऑक्सिजनअभावी रुग्णवाहिकेत रूग्णाचा मृत्यू; गोंदिया जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 17:02 IST2020-08-04T17:01:39+5:302020-08-04T17:02:32+5:30
गोंदिया तालुक्यातील काटी (बिरसोला) येथील एका रूग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.४) पहाटेच्या सुमारास घडली.

ऑक्सिजनअभावी रुग्णवाहिकेत रूग्णाचा मृत्यू; गोंदिया जिल्ह्यातील घटना
नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर कमी असला तरी आता आरोग्य विभागाच्या उदासीनता आणि हलगर्जीपणामुळे रूग्णांचा मृत्यू होत आहे. गोंदिया तालुक्यातील काटी (बिरसोला) येथील एका रूग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.४) पहाटेच्या सुमारास घडली.
काटी येथील ४० वर्षाच्या महिलेला ताप आला, श्वासोच्छश्वासाचा त्रास होता आणि छातीत दुखू लागल्याने सोमवारी (दि.३) उपचारासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सायंकाळी ६ वाजता दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी या महिलेवर उपचार करण्यासाठी कोरोना चाचणी करण्यासाठी स्वॅब नमुने घेतले. परंतु तिची प्रकृती खालावत होती म्हणून तेथे कार्यरत डॉ. मोहबे यांनी यासंदर्भात वैद्यकीय अधिष्ठाता यांना माहिती देऊन काटी येथील व गोंदिया शास्त्री वॉर्डातील एक अशा दोन रूग्णांना पुढील उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयातून मंगळवारी पहाटे २.३० वाजता नागपूरसाठी १०८ या रूग्णवाहिकेने रवाना करण्यात आले.
रूग्णवाहिका बोलविण्यात आली तेव्हा त्या रूग्णवाहिकेतील सिलिंडरमधील ऑक्सिजन संपले होते म्हणून त्यांनी ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वैद्यकीय महाविद्यालयाकडे केली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी सिलिंडर पूर्णपणे भरले आहे किंवा नाही याची खात्री न करताच निष्काळजीपणे काम करीत कमी भरलेले सिलिंडर त्या रूग्णवाहिकेला दिले. रूग्णवाहिका नागपूरच्या दिशेने रवाना झाली. रूग्णवाहिका सडक-अर्जुनी तालुक्याच्या डव्वापर्यंतच गेली असता ऑक्सिजन संपल्याने तडफडून रूग्णाचा मृत्यू झाला. त्या रूग्ण वाहिकेत दोन रूग्ण असल्याने ती रूग्णवाहिका परत गोंदियाला आणण्यात आली. काटी येथील ज्या ४० वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला ती कोरोनाची संशयित रूग्ण असल्याने तिचा मृतदेह एका पॉलीथीनमध्ये पॅक करून तिच्या गावाला पाठविण्यात आला.
शास्त्री वॉर्डातील रूग्णाला पुन्हा दुसºया रूग्णवाहिकेने नागपूरला रवाना करण्यात आले. गोंदियातून रूग्ण घेऊन नागपूरला निघालेल्या रूग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडर अवघ्या ३० कि.मी.अंतरावर गेल्यावर संपणे ही बाब आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी आहे. ऑक्सिजनअभावी रूग्णाचा मृत्यू होणे ही बाब कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणा किती सजगपणे काम करीत आहे दर्शविते.
तब्बल दोन तास उशिराने आली रूग्णवाहिका
गंभीर असलेल्या रूग्णांना नागपूर रेफर करण्यासाठी रूग्णवाहिका बोलाविण्यात आली. परंतु तब्बल दोन तास रूग्णवाहिका आलीच नाही असे वैद्यकीय अधिष्ठाता व्ही.पी.रूखमोडे यांनी सांगितले. त्यानंतर आलेल्या रूग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलिंडर संपले होते. त्यामुळे शासकीय वैद्यकीत महाविद्यालयातून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला. मात्र ते सिलिंडर पूर्ण भरले अथवा अर्धे आहे हे तपासण्याची जबाबदारी ही १०८ या रूग्णावाहिकेच्या डॉक्टर व तेथील ब्रदरची होती.
कोविडसाठी १६७ ऑक्सिजन सिलिंडर
कोविड रूग्णांच्या सुरक्षेसाठी २० लहान व १४७ मोठे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असल्याचे अधिष्ठाता यांनी सांगितले. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असताना ऑक्सिजनअभावी रूग्णांचा मृत्यू होत असेल तर या प्रकाराला हलगर्जीपणाशिवाय दुसरे काहीच म्हणता येणार नाही.
१२ लावले ३० व्हेंटिलेटर नवीन आले
गोंदिया जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी सुरूवातीपासून १२ व्हेंटिलेटर लावण्यात आले. परंतु जिल्ह्यातील कोरोना रूग्णासाठी व्हेंटीलेटरवर कमी जात असल्यामुळे नवीन आलेले ३० व्हेंटिलेटर अद्याप लावण्यात आले नाही. म्हणजेच कोविड केअर सेंटरसाठी जिल्ह्यात ४२ व्हेंटीलेटरची सोय करण्यात आली आहे.
कोरोना संशयित असलेल्या त्या मृताचा स्वॉब आधीच घेण्यात आला. परंतु आतापर्यंत तपासणीचा रिपोर्ट आला नाही. ऑक्सिजन सिलिंडरचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना ऑक्सिजनअभावी रूग्णाचा मृत्यू होणे ही बाब दुर्दैवी आहे. या रुग्णाचा ऑक्सीजनअभावी मृत्यू झाला की दुसरे काही कारण आहे याची चौकशी करू.
डॉ.व्ही.पी.रूखमोडे, वैद्यकीय अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.