शेतात वीज पडून सुनेचा मृत्यू;सासू-सासरे जखमी, भोयरटोला येथील घटना
By अंकुश गुंडावार | Updated: July 21, 2023 18:38 IST2023-07-21T18:38:26+5:302023-07-21T18:38:54+5:30
रोवणीचे काम सुरु असताना घडली घटना

शेतात वीज पडून सुनेचा मृत्यू;सासू-सासरे जखमी, भोयरटोला येथील घटना
अंकुश गुंडावार, देवरी: तालुक्यातील ग्रामपंचायत शिलापूर अंतर्गत येत असलेल्या भोयरटोला येथे स्वतःच्या शेतात भातरोवणीचे काम करीत असलेल्या सुनेचा अंगावर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर सासू सासरे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२१) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. ललिता कैलास राऊत असे मृतक सूनचे नाव आहे. तर गणेशराम पांडुरंग राऊत (६२) अनुसया गणेशराम राऊत (५५) असे जखमी सासू सासऱ्याचे नाव आहे.
तालुक्यातील भोयरटोला येथील राऊत कुटुंबातील सासू,सासरे व सून स्वत:च्या शेतात शुक्रवारी रोवणीचे काम करीत होते. रोववणीचे काम सुरू असताना दुपारी २ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान शेतातून कडेला धावत जात असलेल्या ललिता कैलास राऊत (३४) हिच्या अंगावर वीज काेसळली यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर सासरे गणेशराम पांडुरंग राऊत व सासू अनुसया गणेशराम राऊत हे जखमी झाले. दरम्यान शेतात उपस्थित कुटुंबीय शेतमजुरांनी त्यांना देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.