अंधारातील घरांना मिळणार ‘ज्योती’
By Admin | Updated: October 24, 2016 00:46 IST2016-10-24T00:46:46+5:302016-10-24T00:46:46+5:30
अद्याप वीज जोडणी न मिळालेल्या दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांच्या घरातील अंधार दूर सारण्यासाठी

अंधारातील घरांना मिळणार ‘ज्योती’
दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना : २१ हजार बीपीएल लाभार्थ्यांना मिळणार लाभ
गोंदिया : अद्याप वीज जोडणी न मिळालेल्या दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांच्या घरातील अंधार दूर सारण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना राबविली जाणार आहे. परिमंडळातील गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील २१ हजार १७६ बीपीएल लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून महावितरणच्या माध्यमातून त्यांच्या घरातही हक्काची ज्योत पेटणार आहे.
जग बदलत चालले असून नवनवीन तंत्रज्ञान आले आहे. पैसा खर्च करून विविध सुख सोयीच्या वस्तू घेता येतात व नागरिकांना त्यांची सवय लागली आहे. मात्र असे असताना आजही कित्येकांच्या घरात वीज पोहोचलेली नाही. अंधारातच त्यांना आजही आपले दिवस-रात्र काढावे लागत असल्याचे वास्तव आहे. वीज जोडणी घेण्या इतपत त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे ते यापासून वंचीत आहे. अशाच घटकाच्या घरात वीज पोहोचावी यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असून दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना यातून तयार झाली आहे.
ग्रामीण व शहरी भागात अखंडीत व दर्जेदार वीज सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशातून केंद्र शासनाची दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना राबविली जात आहे. वीज जोडणी नसलेल्या बीपीएल गटातील नागरिकांच्या घरातील अंधार दूर करण्यासाठी व त्यांना हक्काचे कनेक्शन देता यावे यासाठी ही योजना राबविली जात आहे. यांतर्गत परिमंडळांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील १७ हजार ४११ तर भंडारा जिल्ह्यातील तीन हजार ७६५ लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा दिला जाणार आहे.
विशेष म्हणजे या कामांना मंजूरी मिळाली असून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कामाचे आदेश दिल्यानंतर या योजनेतर्गत बीपीएल घटकातील लाभार्थ्यांना वीज जोडणी दिली जाणार आहे. असे झाल्यास त्यांना आता अंधारात रहावे लागणार नाही. याकरिता परिमंडळासाठी ७२६८.२८ लाख रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.(शहर प्रतिनिधी)