गोंदियात दरवाढीच्या निषेधार्थ प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 14:06 IST2018-05-25T14:06:10+5:302018-05-25T14:06:30+5:30
खा. पटेल यांनी गोंदियात गांधी प्रतिमा ते उपविभागीय कार्यालयापर्यंत सायकल चालवून पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविला.

गोंदियात दरवाढीच्या निषेधार्थ प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात सायकल रॅली
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे महागाईमध्ये वाढ होत असून त्याचा फटका गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. या दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी (दि.२५) दुपारी १२.३० वाजता स्थानिक गांधी प्रतिमा चौकातून खा. प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्त्वात सायकल रॅली काढण्यात आली. खा. पटेल यांनी गांधी प्रतिमा ते उपविभागीय कार्यालयापर्यंत सायकल चालवून पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविला. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन रॅलीला सुरूवात झाली. त्यानंतर ही सायकल रॅली आंबेडकर चौकात पोहचली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला खा.पटेल यांनी माल्यार्पण केले. त्यानंतर सिव्हिल लाईन परिसरातील उपविभागीय कार्यालयाजवळ सायकल रॅली पोहचली. खा. पटेल हे स्वत: सायकल चालवित रॅलीत सहभागी झाल्याने या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. रॅलीत माजी. आ. राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, माजी. आ. दिलीप बन्सोड यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले.