ग्राहकांनी हक्काबाबत जागरूक असावे

By Admin | Updated: March 16, 2015 00:03 IST2015-03-16T00:03:21+5:302015-03-16T00:03:21+5:30

समाजातील प्रत्येक व्यक्तीचा कुठल्या ना कुठल्या निमित्ताने ग्राहक म्हणून संबध येतो. अनेक बनावट व भेसळ वस्तूंपासून तसेच जाहिरातींच्या माध्यमातून त्याची फसवणूक होवू शकते.

Customers should be aware about the claim | ग्राहकांनी हक्काबाबत जागरूक असावे

ग्राहकांनी हक्काबाबत जागरूक असावे

गोंदिया : समाजातील प्रत्येक व्यक्तीचा कुठल्या ना कुठल्या निमित्ताने ग्राहक म्हणून संबध येतो. अनेक बनावट व भेसळ वस्तूंपासून तसेच जाहिरातींच्या माध्यमातून त्याची फसवणूक होवू शकते. अशी फसवणूक झाल्यानंतर न्याय मिळण्यासाठी ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी अभ्यासुवृत्ती जोपासून जागरूक असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष अतुल आळशी यांनी केले.
गोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात रविवारी (दि.१५) जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी तिरोडाचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, गोरेगावच्या तहसीलदार शिल्पा सोनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आळशी पुढे म्हणाले, ग्राहक हा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक आहे. जो वस्तु विकत घेतो तो ग्राहक, वस्तु घेतांना त्याचे वजन योग्य आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. वस्तूंवरील किंमतीपेक्षा अधिक दराने वस्तू खरेदी करू नये, जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे सांगितले.
ग्राहकांनी अन्याय सहन करू नये असे सांगून आळशी म्हणाले, एका ग्राहकाने दुसऱ्या ग्राहकाला मदत करावी. ग्राहकांची नेहमीच फसवणूक होत असते. त्यासाठी ग्राहकांना जागृत राहण्यासाठी कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रमुख अतिथी म्हणून महिरे म्हणाले, काळाबाजार, भेसळ, फसवणूक, ग्राहकांवर होणार अन्याय थांबविण्यासाठी ग्राहकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश आहे.
काळे म्हणाले, ग्राहकांच्या सरंक्षणाच्या १९८६ चा ग्राहक सरंक्षण कायदा आहे. या कायद्याची आपण अंमलबजावणी केली पाहिजे. जास्तीत जास्त नागरिकांना विशेषत: ग्रामीण भागात या कायद्याची माहिती व्हावी, लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी प्रत्येकाने जागृत असले पाहिजे असे सांगून राजीव गांधी जीवनदायी योजनेचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकातून तहसीलदार सोनाळे म्हणाल्या, ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ रोजी अस्तित्वात आला. ग्राहकांचे सरंक्षण करण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला आहे. त्यासाठी प्रत्येकाने नेहमी जागरूक असायला पाहिजे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये. ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्काबाबत जनजागृती निर्माण करून त्यांचे सरंक्षण करण्यासाठी ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा अध्यक्ष राठौड म्हणाले, ग्राहकांना त्यांचे मुलभूत अधिकार माहित होणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या प्रत्येक समस्यांचे निराकरण करण्यासाठी नेहमीच अखिल भारतीय ग्राहक पंचायत भक्कमपणे आपल्या पाठीशी उभा असतो. परंतु ग्राहकांनी आपले कर्तव्य विसरू नये असेही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी गोरेगाव येथील भारत गॅस एजन्सी, वजनमाप कार्यालय गोंदिया, जय गायत्री आॅटोमोबाईल्स मुंडीपार यांचे ग्राहक प्रबोधन प्रदर्शन स्टॉल्स लावण्यात आले होते.
संचालन अशोक चेपटे व युवराज माने यांनी केले. आभार युवराज बडे यांनी मानले. कार्यक्रमास नायब तहसीलदार के. बी. शर्मा, जि.प. सदस्या सीता रहांगडाले, जिल्हा ग्राहक सरंक्षणाचे चिंतामण बिसेन, गोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रदीप जैन व नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी पुरवठा निरीक्षक एस.एम. शुक्ला, अर्चना पारधीकर, एस.एम. मिर्झा, रमीता आगाशे, तिवारी व दलदले यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Customers should be aware about the claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.