न्यू इंडिया विमा कंपनीला ग्राहक न्यायमंचचा झटका

By Admin | Updated: March 15, 2015 01:30 IST2015-03-15T01:30:01+5:302015-03-15T01:30:01+5:30

सर्व कागदपत्रे सादर करूनही शवविच्छेदन अहवाल सादर न केल्याचे कारण समोर करून शेतकरी अपघात विमा नाकारणाऱ्या न्यू इंडिया विमा कंपनीला

Customer Justice shock to New India Insurance Company | न्यू इंडिया विमा कंपनीला ग्राहक न्यायमंचचा झटका

न्यू इंडिया विमा कंपनीला ग्राहक न्यायमंचचा झटका

गोंदिया : सर्व कागदपत्रे सादर करूनही शवविच्छेदन अहवाल सादर न केल्याचे कारण समोर करून शेतकरी अपघात विमा नाकारणाऱ्या न्यू इंडिया विमा कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने चांगलाच झटका दिला. यात मृत शेतकऱ्याच्या पत्नीला एक लाख रूपये विमा रक्कम, तक्रारीचा खर्च व नुकसान भरपाई ३० दिवसांत देण्याचे आदेश दिले.
शेतकरी सहेसराम कारू नागपुरे (रा. इर्री) यांचा ३ फेब्रुवारी २०१२ रोजी दुचाकीवर मागे बसून जाताना दुचाकी घसरल्याने घडलेल्या अपघातात मृत्यू झाला. त्यांची पत्नी पार्वता नागपुरे यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा दावा न्यू इंडिया विमा कंपनीला सादर केला. मात्र उत्तरीय तपासणी अहवाल सादर न केल्याचे कारण सांगून कंपनीने दावा फेटाळला होता. त्यामुळे पार्वता नागपूर यांनी ग्राहक न्यायमंचात १६ सप्टेंबर २०१४ रोजी तक्रार दाखल केली.
नोटिसेस बजावल्यावर विरूद्ध पक्ष सदर विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक व क्षेत्रीय व्यवस्थापकांनी उपस्थित राहून जबाब नोंदविला. तर गोंदियाचे तालुका कृषी अधिकारी अनुपस्थित असल्याने प्रकरण एकतर्फी चालविण्याचे आदेश मंचाद्वारे पारित करण्यात आले. विमा कंपनीच्या व्यवस्थापकांनी मृतक ट्रिपल सिट दुचाकीवर जात असल्याने मोटार वाहन नियमांचे उल्लंघन झाले व मृतदेहाचा उत्तरीय तपासणी अहवाल तक्रारकर्तीने सादर न केल्याने दावा फेटाळल्याचे नमूद केले. मात्र तक्रारकर्त्या पार्वताबाईंनी सर्व कागदपत्र सादर केले होते.
तक्रारकर्त्यांच्या बाजूने अ‍ॅड. उदय क्षिरसागर व विमा कंपनीच्या बाजून अ‍ॅड. इंदिरा बघेले यांनी युक्तिवाद केला. त्यावर ग्राहक न्यायमंचने कारणमिमांसा करून शेतकरी या नात्याने विमा योजनेच्या लाभास पात्र असल्याचे सांगत तक्रार मंजूर केली.
या न्यायनिवाड्यात पार्वता नागपुरे यांना त्यांच्या मृत पतीच्या अपघात विम्याचे एक लाख रूपये १६ सप्टेंबर २०१४ पासून दरसाल दरशेकडा नऊ टक्के व्याजाने द्यावे, शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी १० हजार रूपये, तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रूपये ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश ग्राहक न्यायमंचने न्यू इंडिया विमा कंपनीला दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Customer Justice shock to New India Insurance Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.