शाळेतील वर्गखोल्यांवर वक्रदृष्टी
By Admin | Updated: July 16, 2016 02:08 IST2016-07-16T02:08:04+5:302016-07-16T02:08:04+5:30
नगर परिषदेच्या शाळांना पटसंख्या घसरणीचा आजार लागला आहे. अशात या शाळांना पूनर्जिवीत करण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे.

शाळेतील वर्गखोल्यांवर वक्रदृष्टी
विविध कामांसाठी वर्गखोल्यांची मागणी : आमसभेत प्रस्ताव झाला पारित
कपिल केकत गोंदिया
नगर परिषदेच्या शाळांना पटसंख्या घसरणीचा आजार लागला आहे. अशात या शाळांना पूनर्जिवीत करण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र नगर परिषदेत मरणासन्न या शाळांवरच काहींची वक्रदृष्टी असून शाळांमधील वर्गखोल्यांवरच डल्ला मारण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यातून नगर परिषदेच्या या शाळांचे भवितव्य काय हा प्रश्न पडतो.
नगर परिषदेच्या आजघडीला १७ प्राथमिक शाळा, पाच माध्यमिक शाळा व एक कनिष्ठ महाविद्यालय आहे. यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांची स्थिती काही चांगली नाही. विद्यार्थ्यांअभावी पालिकेच्या या शाळा ओस पडल्या असून यातील काही शाळांचे समायोजन करण्याच्या विचारात खुद्द पालिका आहे. एका खाजगी शाळेची संख्या असावी एवढी संख्या पालिकेच्या या शाळा व महाविद्यालयाची आहे.
नगर परिषदेकडून पाहिजे तसे प्रयत्न होत नसल्याने विद्यार्थी व पालक पालिकेच्या शाळांकडे पाठ फिरवीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यासाठी पालिका प्रशासन व शिक्षक हे दोघेही तेवढेच जबाबदार आहेत. पालिका प्रशासनाला शाळांना विद्यार्थ्यांनी भरून काढण्यासाठी काही वेगळे करावे यासाठी वेळ नाही. तर शिक्षकांचे फक्त पगारापुरतेच शाळांशी नाते असल्याचेही आता शहरवासी शाळांची गत बघून बोलू लागले आहेत. त्यात आश्चर्याची बाब म्हणजे, पालिकेचे सदस्यही आता या शाळांच्या जीवावर उठले आहेत.
त्याचे असे की, सदस्यांकडूनच शाळांतील वर्गखोल्या मंडळांना देण्याचे प्रस्ताव आमसभेत मांडण्यात आले आहे. कुणी गरजूंना रोजगार निर्मिती प्रशिक्षणासाठी तर कुणी क्रीडा मंडळांना वर्गखोल्या देण्याचा प्रस्ताव सभेत मांडला असून त्यावर ठराव घेण्यात आला आहे. आज एक-दोन वर्ग खोल्या देण्यात आल्या तर उद्या जाऊन अन्य कुणी आणखी खोल्यांची मागणी करणार. आज रित्या पडून असलेल्या या शाळा विद्यार्थ्यांनी भरून निघाव्या व त्यांचे गतवैभव परतून यावे यासाठी या जबाबदार सदस्यांच्या प्रयत्नांची गरज आहे. त्यांनी यासाठी प्रयत्न केल्यास नक्कीच या शाळांचा कायापालट होणार यात शंका नाही.
आर्थिक दृष्टया कमजोर असलेल्यांसाठी नगर परिषदेच्या शाळा महत्वाची भूमिका बजावत आहेत. मोफत शिक्षणाची सोय नगर परिषदेच्या या शाळांच्या माध्यमातून होत आहे. मात्र घसरणीची ही कीड या शाळांचा दर्जा खालावत असून खालावलेला दर्जाही यामागचे कारण असू शकते. ते काही असो, मात्र नगर परिषदेच्या शाळा महत्वाच्या आहेत. असे असतानाही या शाळांवर आपली नजर टाकणे योग्य नाही. मात्र शाळेच्या वर्गखोल्या मागून या महोदयांनी थेट विद्यार्थ्यांच्या हक्कावरच अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. खेदाची बाब म्हणजे त्यांना या प्रयत्नाला अन्य सदस्यांनी आमसभेतून हिरवी झेंडी दिली आहे.