आगमनाची उत्सुकता शिगेला
By Admin | Updated: February 8, 2015 23:36 IST2015-02-08T23:36:01+5:302015-02-08T23:36:01+5:30
‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान मिळालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सोमवारी (दि.९) गोंदियात येत असल्याने शहरातील समस्त क्रीडा प्रेमींमध्ये उत्साह ओसंडून वाहात आहे.

आगमनाची उत्सुकता शिगेला
प्रेरणादायी क्षण : गोंदियातील क्रीडाप्रेमींना भेटण्याची आस
गोंदिया : ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान मिळालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सोमवारी (दि.९) गोंदियात येत असल्याने शहरातील समस्त क्रीडा प्रेमींमध्ये उत्साह ओसंडून वाहात आहे. सचिनला प्रत्यक्ष भेटण्याची एक संधी मिळाली तर हा आपल्यासाठी आयुष्यातील सर्वात अनमोल क्षण असेल, अशी भावना अनेकांनी लोकमतकडे व्यक्त केली. क्रिकेट खेळाडूंना सचिनसोबत हात मिळवून एक फोटो काढण्याची संधी मिळाली तर आम्ही खा. प्रफुल्ल पटेल व आ. राजेंद्र जैन यांचे आभारी राहू, अशी उत्कटता त्यांनी व्यक्त केली.
शहरातील नवीन खेळाडू डेविड शहारे, सचिन शेंडे, आशुतोष यादव, गुरपीतसिंह गुरूदत्ता, उपेंद्र थापा व हर्ष अरोरा यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला. गुरपीतसिंह गुरूदत्ता नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात शिक्षण घेत असताना युनिव्हर्सिटी खेळाडू होता. गुरूपीतने विदर्श रणजी ट्रॉफी ट्रायलसुद्धा दिली आहे. तसेच हर्ष अरोरा १५, १८ व १९ वयोगटाखालील क्रिकेट स्पर्धा खेळलेला आहे. तो विदर्भ चमूत स्टँडबॉयसुद्धा राहिलेला आहे. डेविड शहारे व उपेंद्र थापा हे दोन्ही खेळाडू अंडर १९ क्रिकेट खेळलेले आहेत. यांच्यासह सचिन शेंडे हा १५, १७, १९ व २२ वयोगटाखालील सामन्यांमध्ये खेळला आहे. सचिन तेंदुलकर यांच्यासह मिळण्याची संधी मिळेल तर तो क्षण खूप रोमांचक असेल, असे या सर्व खेळाडूंचे म्हणणे आहे.
शहरातील नवीन खेळाडूंसह जुन्या खेळाडूंमध्येसुद्धा उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यात दिलीप डोये, शब्बीर अहमद, पप्पू जसानी, अॅड. निजाम आपल्या महाविद्यालयीन दिवसात कॉलेजच्या वतीने खेळले आहेत. त्यांच्या काळात २० वर्षांपूर्वी गोंदिया खूप लहान शहर होते. खेळाडूंना सोयी-सुविधा मिळत नव्हत्या. तसेच खेळांसाठी त्यांना प्रोत्साहन देणारेसुद्धा कुणी नव्हते, असे या जुन्या खेळाडूंचे म्हणणे आहे. पप्पू जसानी यांचे म्हणणे आहे की, ते सचिनला विचारू ईच्छितात की आस्ट्रेलिया वर्ल्ड कपसाठी जी चमू गेली आहे, त्या चमूची बॉलिंग कोणत्या स्तराची आहे?
सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात खा. प्रफुल्ल पटेल व आ. राजेंद्र जैन जनसंपर्कात कमतरता येवू देणार नाहीत.
या दोन्ही नेत्यांनी मनात आणले तर ते शहरातील खेळाडूंना दोन मिनिटांसाठी सचिनला भेटण्याची संधी देवू शकतात. (प्रतिनिधी)