बँक आॅफ इंडियावर वक्रदृष्टी
By Admin | Updated: February 4, 2015 23:16 IST2015-02-04T23:16:05+5:302015-02-04T23:16:05+5:30
बुधवारचा (दि.४) दिवस बँक आॅफ इंडियासाठी अपशकुनी ठरला. त्याचे कारण असे की, बॅकेच्या येथील अग्रसेन भवन जवळील शाखेच्या खातेधारक महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी

बँक आॅफ इंडियावर वक्रदृष्टी
गोंदियात महिलेच्या खात्यातून २४ हजार काढले
गोंदिया : बुधवारचा (दि.४) दिवस बँक आॅफ इंडियासाठी अपशकुनी ठरला. त्याचे कारण असे की, बॅकेच्या येथील अग्रसेन भवन जवळील शाखेच्या खातेधारक महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी २३ हजार ९२० रूपये काढून घेतले. तर तिरोडा तालुक्यातील ग्राम परसवाडा येथील बँकेचे एटीएम मशीन कापून त्यातून एक लाख ८८ हजार रूपये काढून नेण्यात आले आहे.
जवळील ग्राम खमारी येथील रहिवासी मुनेश्वरी चंद्रकुमार पटले (२६) या गावातीलच अध्यापक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी (दि.४) सकाळी १० वाजता दरम्यान त्यांना ९७०९०३७०७९ या क्रमांकावरून मोबाईलवर कॉल आला. एका पुरूषाने त्यांना तुमच्या एटीएमने मागील चार महिन्यांपासून व्यवहार झाले नसल्याने एटीएमचा पीनकोड बदलण्यात आला असल्याचे सांगत पीन कोड मागीतला. यावर मुनेश्वरी पटले यांनी एटीएमचा पीन कोड सांगीतला. त्यानंतर त्या महाविद्यालयात गेल्या व प्रा. रवीप्रकाश चंद्रीकापुरे यांना घडलेला प्रकार सांगीतला.
कॉलकरून लुबाडण्याच्या हा प्रकार असल्याचे त्यांनी दुपारी १२ वाजता दरम्यान येथील बँकेत येऊन खात्यातील रकमेची पाहणी केली. मात्र तोपर्यंत मुनेश्वरी पटले यांच्या खात्यातून २३ हजार ९२० रूपये काढण्यात आल्याचे दिसले. तर त्यांच्या खात्यात फक्त २२ रूपये शिल्लक सोडून दिले होते. प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. मोबाईलवर कॉल करून एटीएमचा क्रमांक जाणून घेण्यासाठी आल्यादिवशी कॉल्स येत असल्याचे कानी पडते. अशा प्रकारांवर पोलिसांकडून कारवाई करणे गरजेचे असून नागरिकांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)
बँक प्रबंधकांना फासण्याचा प्रयत्न
मुनेश्वरी पटले यांच्यासह कित्येकांसोबत फसगतीचा असला प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे यापासून बॅक आॅफ इंडियाच्या अग्रसेन भवन जवळील शाखेचे प्रबंधक ललीत रहांगडाले यांनाही अशाचप्रकारचा कॉल काही दिवसांपूर्वी आला होता. त्यांना एका महिलेने कॉल करून अशाचप्रकारची बतावणी करून एटीएमचा पीनकोड जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रहांगडाले यांनी त्या महिलेला खडसावले असता तिने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन त्यांच्याशी शिवीगाळ करीत फोन बंद केला होता.