वादळाच्या तांडवाने पिकांची दाणादाण
By Admin | Updated: May 7, 2016 01:44 IST2016-05-07T01:44:48+5:302016-05-07T01:44:48+5:30
गुरूवारी रात्री ८ ते ९ वाजतादरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने सालेकसा, देवरी, तिरोडा व गोंदिया तालुक्यातील काही भागात चांगलेच तांडव घातले.

वादळाच्या तांडवाने पिकांची दाणादाण
धानपिकाचे नुकसान : लग्न मंडप उडाले, वीज सेवा खंडित, आंब्यालाही फटका
गोंदिया : गुरूवारी रात्री ८ ते ९ वाजतादरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने सालेकसा, देवरी, तिरोडा व गोंदिया तालुक्यातील काही भागात चांगलेच तांडव घातले. यात शेतातील पिकांसह लग्न वऱ्हाडाची चांगलीच फजिती झाली. आधीच यावर्षी कमी प्रमाणात असलेल्या आंबेही झडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले. गेल्या १५ दिवसात चौथ्यांदा वादळ व पावसाचा फटका सहन करावा लागत आहे.
सालेकसा : वादळाने तालुक्यात गुरूवारच्या रात्री मोठे तांडव घातले. एकीकडे वाऱ्याचे लग्न मंडपे उद्वस्त झाली तर उन्हाळी धान पिकाचेही जबरदस्त नुकसान झालेले दिसून येत आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरावरील टिनाचे, सिमेंटचे शेड उडून केले तर अनेक ठिकाणी वीजेचे तार सुद्धा तुटून पडले. परिणामी तालुक्यातील अनेक गावांत रात्रभर वीज सेवा खंडित राहिली. त्यामुळे प्रचंड उकाड्याला तोंड देत रात्र काढावी लागली.
गुरूवारी दिवसभर वातावरण तापत असताना सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. रात्री ८ वाजेपर्यंत वादळी वाऱ्याने रौद्ररुप धारण केले. तालुक्यात अनेक ठिकाणी लग्न कार्य सुरू असताना वादळाने लग्न मंडपात येवून आपले तांडव सुरू केले. परिणामी काही ठिकाणी कापडी मंडप फाटले. काही उडून गेले. ग्रामीण भागात आजही जांभळाच्या झाडांचे लग्न मंडप तयार केले जातात. ते लग्न मंडपेही वाऱ्याचे जोरात उडून गेले. डेकोरेशनवाल्यांना पुन्हा लग्न मंडप उभे करावे लागत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून आले.
वादळी वाऱ्यानंतर काही ठिकाणी गारपिटीचा मारा सहन करावा लागला. या पावसात उन्हाळी धानपिकाचे कडप पावसात सापडले. त्यामुळे धानाची नासाडी झाली. हे धान आता मातीमोल होताना दिसत आहे. काही ठिकाणी उभ्या पिकावर वाऱ्याचा मारा पडल्याने पीक खाली पडले. शुक्रवआरी धान कापणीचे काम प्रभावित झाले असून अनेक शेतकऱ्यांनी धान कापणी थांबविली आहे.
अचानक आलेल्या पावसात धान मळणीचे काम सापडले असून धान ओले झाल्याचे दिसून आले. धान पाखड होण्याची शक्यता वाढली आहे. धानाच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते व शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.(तालुका प्रतिनिधी)
वनविभागाच्या वाहनाचेही नुकसान
देवरी : गुरूवारच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास देवरी परिसरात जोरदार वादळी पाऊस झाला. या वादळी पावसात वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर उभी असलेली स्वीफ्ट डिझायर गाडीवर (एम.एच. ३५, पी. ४७६६) वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात उभे असलेले आंब्याचे मोठे झाड पडले. यात क्षेत्र सहाय्यक बडोले यांच्या अधिनस्त असलेली फिरत्या पथकाच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. या वादळी पावसात देवरी परिसरातील दुकानावर लावलेले लोखंडी पत्रे व बोर्ड तुटल्याने नुकसान झाले आहे.