जिल्ह्यात झिरो टील ड्रिल यंत्राने पीक लागवडचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 05:00 IST2020-12-20T05:00:00+5:302020-12-20T05:00:27+5:30
गोंदिया जिल्ह्यात धान पिकाचे प्राबल्य असून येथील शेतकरी धानाचेच जास्त प्रमाणात उत्पादन घेतो. त्यातही खरिपात ९५ टक्के धान पिक घेतले जात असून त्यात हलक्या धानाचे प्रमाण जास्त असते. खरिपातील धान पीक काढल्यानंतर सिंचनाची सोय असल्यावर शेतकरी रब्बीची तयारी करतो. यासाठी धानाचे खूंट काढण्यासाठी नांगरणीपासून जमिनीच्या मशागतीची पूर्ण तयारी करावी लागते. मात्र नांगरणी केल्यानंतर जमिनीतील ओलावा नष्ट होतो व जमिन कोरडी पडते.

जिल्ह्यात झिरो टील ड्रिल यंत्राने पीक लागवडचा प्रयोग
कपिल केकत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया : खरिपातील धानाची कापणी झाल्यानंतर जमिनीत कायम असलेल्या ओलाव्याचा फायदा व्हावा या उद्देशातून रब्बी पिकांची लागवड करण्यासाठी जिल्ह्यात झिरो टील ड्रिल यंत्राचा वापर केला जात आहे. कृषी विभागाकडून जिल्ह्यात प्रथमच हा प्रयोग केला जात असून यासाठी गोंदिया व तिरोडा ताक्क्याची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यातून शेतकऱ्याला चांगले उत्पादन घेता येणार असतानाच जमिनीच्या मशागतीसाठी येणारा खर्च सुद्धा वाचणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात धान पिकाचे प्राबल्य असून येथील शेतकरी धानाचेच जास्त प्रमाणात उत्पादन घेतो. त्यातही खरिपात ९५ टक्के धान पिक घेतले जात असून त्यात हलक्या धानाचे प्रमाण जास्त असते. खरिपातील धान पीक काढल्यानंतर सिंचनाची सोय असल्यावर शेतकरी रब्बीची तयारी करतो. यासाठी धानाचे खूंट काढण्यासाठी नांगरणीपासून जमिनीच्या मशागतीची पूर्ण तयारी करावी लागते. मात्र नांगरणी केल्यानंतर जमिनीतील ओलावा नष्ट होतो व जमिन कोरडी पडते. अशात रब्बीसाठी सिंचनाची सोय असल्यास ठीक आहे मात्र नसल्यास शेतकऱ्याला पाण्याची सोय करावी लागते. अशात मात्र झिरो टील ड्रिल यंत्राचा वापर शेतकऱ्यांसाठी चांगलाच फायदेशीर ठरणार आहे.
यात, खरिपातील धान पिकाची कटाई झाल्यानंतर नांगरणी न करता त्याच जमिनीत लगेच झिरो टील ड्रिल यंत्राने पेरणी केल्यास जमिनीतील ओलाव्याने रब्बी पिकांना लाभ होते व चांगले उत्पादन येते. विशेष म्हणजे, धानाचे खूंट जमिनीत राहत असल्याने ते जमिनीतच कुजतात व त्यापासून उच्चप्रतीचे खत तयार होते व ते जमिनीसाठी अत्यंत पोषक आहेत. नेमकी हीच बाब हेरून कृषी विभागाने जिल्ह्यात झिरो टील ड्रिल यंत्राच्या वापराचा प्रयोग हाती घेतला. या यंत्राद्वारे खरिपातील धानाची कापणी झाल्यानंतर लगेच रब्बी पिकांची यंत्राद्वारे करण्यात आली आहे. यासाठी गोंदिया व तिरोडा तालुक्याची निवड करण्यात आली.
असा होणार यंत्राचा फायदा
या यंत्राचा वापर केल्याने खरिपातील जमिनीचा ओलावा कायम राहत असून त्याचा फायदा रब्बी पिकांना मिळतो. धानाचे खूंट जमिनीतच राहत असल्याने जमिनीत सेंद्रीय खत व सेंद्रीय पदार्थांची निर्मिती होते व ते जमिनीसाठी अत्यंत पोषक असतात. परिणामी उत्पादन चांगले मिळते. विशेष म्हमजे, झिरो टील ड्रिल यंत्राचा वापर थेट धान खरिपातील धान कापणी नंतर केला जात असल्याने यासाठी शेतकऱ्यांना जमिनीची मशागत करावी लागत व तेवढा खर्च वाचतो. विशेष म्हणजे, धानाचे खूंट जमिनीत कुजून खत व ऑर्गेनिक कार्बन तयार होत असून हे अत्यंत महत्वाचे घटक आहे.
सुमारे ५०० एकरात केला प्रयोग
झिरो टील ड्रिल यंत्राद्वारे लागवडीचा प्रयोग करण्यासाठी गोंदिया व तिरोडा तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी कृषी औजार निर्मात्यांकडून ३ यंत्र प्रयोगासाठी घेण्यात आले असून याद्वारे सुमारे ५०० एकरात यंदा करडई, मोहरी व हरभराची लागवड करण्यात आली आहे. तयार जमिनीतच यंत्राद्वारे रब्बी पिकांची लागवड करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा जमिन मशागतीचा खर्च वाचला आहे.
शेतकऱ्यांच्या अत्यंत फायद्याचे
झिरो टील ड्रिल यंत्राचा वापर शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदाचा आहे. एकतर जमिन तयार करण्यासाठी लागणारा खर्च वाचत असून शिवाय धानाची खूंट जमिनीत कुजून जमिनीला सेंद्रीय खत मिळते. यातून चांगल्या उत्पादनासाठी फायदा होतो.
- गणेश घोरपडे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी