सततच्या पावसाने परिसरातील पिकांचे नुकसान

By Admin | Updated: July 29, 2014 23:54 IST2014-07-29T23:54:38+5:302014-07-29T23:54:38+5:30

मागे तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे चिंताग्रस्त असलेला शेतकरी आता सुखावला असून शेताची कामे पूर्ण करण्याकरिता त्यांची लगबग सुरु झाली आहे.

Crop damage to the area by continuous rain | सततच्या पावसाने परिसरातील पिकांचे नुकसान

सततच्या पावसाने परिसरातील पिकांचे नुकसान

मुंडीकोटा : मागे तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे चिंताग्रस्त असलेला शेतकरी आता सुखावला असून शेताची कामे पूर्ण करण्याकरिता त्यांची लगबग सुरु झाली आहे. सतत तीन दिवसांपासून पाऊस पडल्याने तलाव, बोड्या, नदी-नाल्यांना पूर आले. नदी व नाल्याकाठावरील धानपिके व नदी नाल्यांना लागून असलेल्या शेतातील धानपीक तीन दिवसांपासून पाण्याखाली दबून राहिले. तसेच शेतात पाणी साचून असल्यामुळे धानपीक सडून नष्ट झाले.
तीन दिवसांच्या पावसाने कहर केला. अगोदरच कर्जबाजारी शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. गाव खेड्यांतील शेतकरी आपल्या शेतात राबतो. त्याचप्रमाणे या परिसरात उद्योगधंदे नसल्याने शेतीवर अवलंबून राहून तो आपला उदरनिर्वाह करतो. बँकेकडून घेतलेले कर्ज व उसनवारीची परतफेड या विचाराने शेतकरी आता चिंतातूर झाला आहे.
संततधार पावसाने उसंत न दिल्यामुळे वैनगंगा नदीकाठावरील शेतात लावलेले धान पुरात वाहून गेले. त्या शेतकऱ्यांनी जेमतेम रोवणी केली होती. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तीन दिवस पुराचे पाणी साचून राहिल्यामुळे पिके सडून नष्ट झाली. यावेळी दुबार धानाची रोवणी करावी करावी? असे संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे. यावेळी पुन्हा शेतकरी संकटात सापडलेला दिवस आहे. जोरदार पावसाने सतत हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहे.
पण यावेळी शेतकऱ्यांचा कैवारी कुणीही दिसत नाही. प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतात काय, असा सवालही शेतकरी करीत आहेत.
सतत तीन दिवसांच्या पावसाने मुंडीकोटा परिसरातील काही घरांची पडझड झाली असून अनेक घरे पूर्णत: बाधित झाली आहेत. तर काही घरांच्या भिंती पडलेल्या दिसत आहेत. यामुळे राहण्याकरिता घरे राहली नाहीत. पावसाळ्यात रहावे कुठे? असा प्रश्न यांच्यासमोर उभा आहे. (वार्ताहर)

Web Title: Crop damage to the area by continuous rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.