वर्षभरात २३२२ अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:24 IST2021-01-14T04:24:35+5:302021-01-14T04:24:35+5:30
गोंदिया : जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त आहे. गोंदिया जिल्ह्याला लागून गडचिराेली जिल्ह्याची सीमा आहे. गडचिरोली व चंद्रपूर या दोन ...

वर्षभरात २३२२ अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
गोंदिया : जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त आहे. गोंदिया जिल्ह्याला लागून गडचिराेली जिल्ह्याची सीमा आहे. गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांत दारूबंदी असताना गोंदिया जिल्ह्यात मोहफुलाच्या दारूचा पूर वाहतो. गोंदिया जिल्हा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमेलगत असल्याने या दोन राज्यांतूनही अवैध दारूची तस्करी होत असते.
गोंदिया जिल्ह्यात नकली दारू तयार करण्याच्या कारखान्यांपासून तर मोहफुलाची भट्टी लावून हातभटीची दारू गाळण्याचे काम ग्रामीण भागात केले जाते. मोहफुलापासून हातभट्टीची दारू गाळून विक्री करणारे मोठ्या प्रमाणात असल्याने दोन हजारांपेक्षा अधिक गुन्हे हे मोफुलापासून दारू गाळणाऱ्या लोकांवर आहेत. वर्षभर दारू गाळण्यासाठी मोहफुलाची आयात छत्तीसगड व मध्य प्रदेशातून केली जाते. गोंदिया जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध वर्षभर कारवाई केली आहे. या २ हजार ३२२ कारवाईत कोट्यवधीचा माल जप्त करण्यात आला आहे. दारू गाळण्याचे साहित्य, मोहफुल व दारू जप्त करण्यात आली. सन २०१९ मध्ये १८४८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या कारवाईच्या तुलनेत सन २०२० मध्ये २३२२ कारवाया करण्यात आल्या. ४७४ कारवाया अधिक झाल्या आहेत. गोंदिया जिल्हा पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
बॉक्स
नकली दारूवर अंकुश कसा बसणार
गोंदिया जिल्ह्यात नकली दारू तयार केली जाते. सन २०२० या वर्षात नकली दारूच्या दोन कारखान्यांवर छापा टाकण्यात आला होता. एक कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने, तर दुसरी कारवाई गोंदिया शहर पोलिसांनी केली होती. मध्य प्रदेशच्या मार्गानेही मोठ्या प्रमाणात नकली दारू गोंदिया जिल्ह्यात येते. परंतु, या नकली दारूवर कारवाई करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी धजावत नाही.