कोविड लसीकरणात जिल्हा राज्यात टॉप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:30 IST2021-01-25T04:30:26+5:302021-01-25T04:30:26+5:30
गोंदिया : कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंट लाईन कोरोना योद्ध्यांना लसीकरण केले जात आहे. शनिवारी जिल्ह्यातील ४२८ फ्रंट लाईन ...

कोविड लसीकरणात जिल्हा राज्यात टॉप
गोंदिया : कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंट लाईन कोरोना योद्ध्यांना लसीकरण केले जात आहे. शनिवारी जिल्ह्यातील ४२८ फ्रंट लाईन योध्दयांना तीन लसीकरण केंद्रावरून लसीकरण करण्यात आले. त्यामुळे कोविड लसीकरण मोहिमेत जिल्हा राज्यात टॉपवर तर गडचिरोली जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर होता.
जिल्ह्यात सध्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, तिरोडा उपजिल्हा रुग्णालय, देवरी ग्रामीण रुग्णालय या तीन केंद्रावरून लसीकरण केले जात आहे. कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ८५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १२०० वर फ्रंट लाईन कोरोना योध्दयांना लसीकरण करण्यात आले आहे. कोविड लसीकरणाची मोहीम लवकर पूर्ण करून दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करता यावी, या दृष्टीने आता जिल्हा आरोग्य प्रशासन कामाला लागले आहे. शनिवारी जिल्ह्यातील या तिन्ही केंद्रावरून तब्बल ४२८ फ्रंट लाईन योध्दयांना लसीकरण करण्यात आले. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा होय. यामुळे राज्यात कोविड लसीकरणात जिल्हा टॉपवर आहे. आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील ८५०० फ्रंट लाईन योध्दयांना कोविड लसीकरणाचे उद्दिष्ट महिनाभरात पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे सोमवारपासून एकूण सहा लसीकरण केंद्रावरुन फ्रंट लाईन योध्दयांना लसीकरण करण्यात येणार आहे. एका केंद्रावरून शंभर फ्रंट लाईन योध्दयांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी केंद्रपण निश्चित करण्यात आले आहे. अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालय, सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालय आणि खमारी प्राथमिक आरोग्य केंद्र या केंद्रावरून सोमवारपासून लसीकरणास प्रारंभ होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्याची कोविड लसीकरणाची गती पाहता ही मोहीम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.