खरीप हंगामातील चुकारे देण्यास महामंडळाची दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST2021-01-13T05:16:05+5:302021-01-13T05:16:05+5:30
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी, गोठणगाव, ईळदा येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांची खरीप हंगामातील ...

खरीप हंगामातील चुकारे देण्यास महामंडळाची दिरंगाई
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी, गोठणगाव, ईळदा येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांची खरीप हंगामातील धान सातबाराप्रमाणे खरेदी केले. मात्र, याचे चुकारे अद्यापही न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर देय रकमेचे बिल तयार करणारा तिन्ही केंद्रांसाठी एकच कर्मचारी काम करीत असल्याने धानाची चुकारे मिळण्यास विलंब होत असल्याचे बोलले जाते. महामंडळातील तोकडी यंत्रणा भरून काढण्यासाठी अधिक कर्मचारी कामाला लावून त्वरित धानाची चुकारे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाच्या आदिवासी महामंडळाने या वर्षीच्या खरीप हंगामातील धान खरेदी केंद्र नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापासून तालुक्यातील केशोरी, गोठणगाव, इळदा येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या मार्फत ऑनलाइन नोंदणी करून, टोकण पद्धतीनुसार धान खरेदी केली आहेत, परंतु दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळाले नाहीत. शेतकऱ्यांना धानाचे चुकारे न मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. चुकारे मिळण्याची दिरंगाई होण्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, या परिसरातील केशोरी, गोठणगाव, इळदा या तिन्ही केंद्रातील खरेदी केलेल्या धानाची हुंडी रक्कम ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून देय रकमेचे बिल तयार करण्यासाठी एकच कर्मचारी कामाला असल्यामुळे शेतकऱ्यांना धानाची चुकारे मिळण्यास दिरंगाई होत असल्याची माहिती आहे.
.....
कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा
महामंडळातील कर्मचाऱ्यांची यंत्रणा तोकडी असल्याचे सिद्ध होते. महामंडळाने शेतकऱ्यांचा खरेदी केलेल्या धानाचे चुकारे त्वरित मिळण्यासाठी ऑनलाइन प्रणालीवर कार्य करणारी कर्मचारी संख्या वाढवून शेतकऱ्यांची अडलेली धानाची चुकारे त्वरित देण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.