बोंडगावदेवी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, सामान्य जनतेने सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. चान्ना प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी (डोंगरवार) यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गावागावातील जनतेने कोरोना चाचणीसाठी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, असे डॉ. कुळकर्णी यांनी कळविले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, सामान्य जनतेला वेळोवेळी आरोग्य मार्गदर्शन करणे तसेच कोरोनासंबंधी घ्यावयाची काळजी याबाबत आरोग्य पथकामार्फत योग्य सल्ला घरपोच देण्यासाठी आरोग्य यंत्रणा अविरत प्रयत्नशील असल्याचे डॉ. कुळकर्णी यांनी सांगितले. कार्यक्षेत्रातील गावांतील मुख्य केंद्रात कोरोना चाचणी करण्याचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. सिरेगाव या ठिकाणी तसेच चान्ना प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी घेण्यात आली. मनामध्ये कोणतीही भीती व बाळगता कोरोना चाचणीसाठी नागरिकांनी स्वत:हून पुढे यावे. कोरोनाचा संक्रमण टाळण्यासाठी स्वत:ची जबाबदारी समजून समाजहितासाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे सांगून कोरोना चाचणीसाठी नावे नोंदवून आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
बॉक्स
कोरोना लसीसाठी नावे नोंदवा
कोरोनावर आळा घालण्यासाठी लस उपलब्ध झाली आहे. टप्प्याटप्प्याने कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. ६० वर्षांवरील तसेच ४५ ते ५९ वर्षाच्या आतील जनतेने कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नावे नोंदवावी. वरील वयोगटातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.. श्वेता कुळकर्णी यांनी कळविले आहे.