२१ दिवसात कोरोना रुग्ण वाढीचा दर तिप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:00 IST2020-09-22T05:00:00+5:302020-09-22T05:00:29+5:30
जिल्ह्यात २७ मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर दीड महिना जिल्हा कोरोनामुक्त होता. मार्च ते जुलै पाच महिन्यांच्या कालावधीत केवळ २८८ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. ऑगस्ट महिन्यात कोरोना बाधितांचा ग्राफ अधिक वाढला. आॅगस्ट महिन्यात ११६९ कोरोना बाधितांची नोंद झाली तर २६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला.

२१ दिवसात कोरोना रुग्ण वाढीचा दर तिप्पट
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून मागील २१ दिवसात तब्बल ३४०७ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर ५० कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून कोरोना बाधितांचा वेग सप्टेंबर महिन्यात तिप्पट झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
जिल्ह्यात २७ मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर दीड महिना जिल्हा कोरोनामुक्त होता. मार्च ते जुलै पाच महिन्यांच्या कालावधीत केवळ २८८ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. ऑगस्ट महिन्यात कोरोना बाधितांचा ग्राफ अधिक वाढला.
आॅगस्ट महिन्यात ११६९ कोरोना बाधितांची नोंद झाली तर २६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. ऑगस्ट महिन्यात वाढलेला कोरोना रुग्ण वाढीचा वेग सप्टेंबर महिन्यात कमी होईल असा अंदाज आरोग्य यंत्रणेकडून वर्तविला जात होता. मात्र तो अंदाज पूर्णपणे फोल ठरला आहे. १ ते २१ सप्टेंबर या २१ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ३४०७ कोरोना बाधितांची नोंद झाली असून ५० कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर तिप्पट झाला असून सरासरी दररोज १५० कोरोना बाधितांची नोंद होत आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम असतानाच कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे.
मागील २१ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ५० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.सरासरी दररोज तीन कोरोना बाधितांचा मृत्यू होत असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
वाढते संक्रमण रोखण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणेचा अनागोंदी कारभार पुढे येत आहे. शासकीय रुग्णालयात रिक्त असलेली डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याची ओरड आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना त्याला प्रतिबंध लावण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरल्याचे चित्र आहे.
तक्रारीत दररोज वाढ
कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्वॅब नमुने तपासणी केंद्रावर सुध्दा अनागोंदी कारभार कायम आहे. येथे स्वॅब नमुने वेळेत घेतले जात नसून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्ण एकत्रच रांगेत लागत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्यास मदत होत आहे.