गोंदिया शहरात कोरोनाचा विस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:00 IST2020-08-27T05:00:00+5:302020-08-27T05:00:42+5:30
जिल्ह्यातील शहरी भागासह आता ग्रामीण भागात सुध्दा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तर गोंदिया शहरात मागील दहा दिवसांच्या कालावधीत तिनशेहून अधिक रुग्ण आढळले आहे. शहरात हळूहळू कोरोनाचा विळखा घट होत आहे. शहरातील बहुतेक भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बुधवारी आणखी ५१ कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोंदिया शहरात कोरोनाचा विस्फोट
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. सर्वाधिक रुग्ण गोंदिया शहरात आढळत असल्याने शहर आता कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्याचे चित्र आहे. बुधवारी (दि.२६) जिल्ह्यात ६२ कोरोना बाधित रुग्ण आढळले. यापैकी सर्वाधिक ५१ रुग्ण हे गोंदिया शहरातील असल्याने शहरात कोरोनाचा विस्फोट झाल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.गोंदिया तालुक्यातील दासगाव येथील एका कोरोना बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यातील शहरी भागासह आता ग्रामीण भागात सुध्दा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तर गोंदिया शहरात मागील दहा दिवसांच्या कालावधीत तिनशेहून अधिक रुग्ण आढळले आहे. शहरात हळूहळू कोरोनाचा विळखा घट होत आहे. शहरातील बहुतेक भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बुधवारी आणखी ५१ कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा वाढत असताना यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये अद्यापही सोयी सुविधांचा अभाव आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बाई गंगाबाई महिला रूग्णालयात रुग्णांना दाखल करण्यास बेड अपुरे पडत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना एकाच वार्डात ठेवून खाली बेड टाकून उपचार करावे लागते. तर स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव असल्याने अनेक रुग्ण येथे दाखल होवून उपचार घेण्यास घाबरत असल्याचे चित्र आहे.एकंदरीत प्रशासकीय यंत्रणेचा सावळा गोंधळ आणि आरोग्यविषयक सोयी सुविधांचा अभाव याच गोष्टी जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसल्यानंतर आणि बाहेरुन आल्यानंतर याची माहिती आरोग्य विभागाला देण्यास नागरिक कुचराई करीत आहेत. परिणामी मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.
गणेशनगरमध्ये कोरोनाचा उद्रेक
बुधवारी आढळलेल्या ६२ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ५१ रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहे. यामध्ये गणेशनगर येथील २५ रुग्ण, यादव चौक, अरूणनगर, वसंतनगर, रिंग रोड मजार, रामनगर,फुलचुर येथील प्रत्येकी एक रुग्ण, सिव्हिल लाईन येथील दोन रुग्ण, साई मंगलम रेसिडेंसी येथील तीन रुग्ण, गोंदिया तालुक्यातील कुडवा येथील श्रीरामनगरचे तीन आणि हनुमान मंदिर परिसरातील एक रुग्ण, सावराटोली २,गिरोला ६ तेढवा १, नंगपुरा मूर्री १ व दासगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तिरोडा तालुक्यातील बेलाटी खुर्द येथील एक रुग्ण व नहारटोला येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. आमगाव शहरातील एक रुग्ण, सडक/अर्जुनी येथील दोन रुग्ण,देवरी येथील दोन रुग्ण व एक रुग्ण फुटाणा येथील आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील एक रुग्ण आणि बाहेर जिल्ह्यातील व राज्यातील एक रुग्णाचा समावेश आहे.
१३ हजार ४०४ नमुने कोरोना निगेटिव्ह
कोरोना संसर्गांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील १४९९१ व्यक्तींचे स्वॅब नमुने गोंदिया येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ११७२ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर १३ हजार ४०४ नमुने निगेटिव्ह आले आहे. २५५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलबिंत असून ४३३ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत ९२२७ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये ८८५४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले.२७३ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७७२ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या स्थितीत ३७८ कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण आहे.