कोरोना ठरतोय अडसर; शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी जिल्ह्यात १०३९ पथके (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST2021-03-06T04:28:13+5:302021-03-06T04:28:13+5:30
गोंदिया : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी ...

कोरोना ठरतोय अडसर; शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी जिल्ह्यात १०३९ पथके (डमी)
गोंदिया : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभा घेऊन नियोजन करण्यात आले. कोविड-१९ संसर्ग कालावधीत अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. ६ ते १८ वयोगटातील अनेक बालके शाळाबाह्य झाल्याचे दिसून येतात. अशा बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी राज्य शासनाने २३ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयानुसार विशेष शोध मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. या मोहिमेनुसार ३ ते ६ वयोगटातील जी बालके एकात्मिक बाल विकास योजनेचा लाभ घेत नाहीत तसेच खाजगी बालवाडी, इंग्रजी माध्यमांचे ज्युनिअर केजी, सिनिअर केजीमध्ये जात नाहीत. ६ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य बालकांची शोधमोहीम ५ ते १५ मार्च २०२१ या कालावधीत राबवायची आहे.
ही शाळाबाह्य बालकांची शोधमोहीम ५ ते १५ मार्चदरम्यान (सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून) घेण्यात येईल. प्रत्येक गावासाठी लोकसंख्येनुसार एक अंगणवाडी सेविका, मदतनीस व शिक्षकांची (प्राथमिक व माध्यमिक) प्रगणक म्हणून नेमणूक करावी, गावनिहाय सर्वेक्षणासाठी प्रगणकांचे नियोजन करण्यात आले. इयत्ता ५वी ते ८वी व ९वी ते १२वीच्या शाळा सुरू असल्यामुळे ५० टक्के शिक्षकांची शोधमोहिमेकरिता नियुक्ती करण्यात आली.
...........
जिल्ह्यात एकूण पथके - १,०३९
जिल्ह्यात एकूण कर्मचारी - ३,५६६
...........
तालुकानिहाय पथके
आमगाव - ११०
सालेकसा - ११२
देवरी - १४२
सडक-अर्जुनी - १०९
अर्जुनी-मोरगाव - १३२
गोरेगाव - १०८
तिरोडा - १३८
गोंदिया - १८८
................
दोन बैठका घेतल्या
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने ९ ते १२ फेब्रुवारी या चार दिवसांत शोधमोहीम राबविली आहे. त्यातील पहिल्या दोन दिवसांत गोंदिया जिल्ह्यातील ४०२ वीटभट्ट्यांवर भेट देऊन १९५ शाळाबाह्य बालके वीटभट्ट्यांवरून शोधली. तर ११ व १२ फेब्रुवारी या दोन दिवसांत ५० शाळाबाह्य बालके अस्थायी कुटुंबांकडून शोधण्यात आली. त्यावरून शासनाने राज्यभर ही मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्यामुळे दोन वेळा शिक्षण विभागाच्या बैठका झाल्या.
.........
अधिकारी व शिक्षकांनी दिल्या भेटी
१) शोधमोहीम विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, तालुका समन्वयक, १०२६ बालरक्षक, शिक्षकांच्या सहकार्याने घेण्यात आली. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे, इयत्ता १ली ते ४थीच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत. इतर राज्यांत अजूनही उच्च प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नाहीत. काही पालक बालकांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. तरीसुद्धा शिक्षण सुरू आहे. शिक्षण यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचारी, बालरक्षक, शिक्षकांनी उत्साहाने शोधमोहिमेमध्ये सहभाग घेतला.
२) शोधमोहिमेमध्ये आढळलेली बालके ही स्थलांतर होऊन आली आहेत. सदर बालके शाळाबाह्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी जवळच्या शाळेत बालकांना दाखल करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. शोधमोहिमेत शाळाबाह्य बालकांना शोधले जाणार आहे, अशी माहिती समन्वयिका कुलदीपिका बोरकर यांनी दिली.
कोट
शाळा बंद न ठेवता विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापन प्रभावित होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. कुटुंबाची शाळाबाह्य शोधमोहीम करीत असताना अंगणवाडी सेविका, मदतनीस व शिक्षकांनी एकत्रितपणे सर्वेक्षण करणार आहेत. दैनिक आढावा जिल्हास्तरावर कळविणार आहेत. या संपूर्ण जिल्ह्याचा आढावा स्वत: मी घेणार आहे.
- राजकुमार हिवारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प. गोंदिया.
........
ग्रामसेवक संघटनाही करेल सहकार्य
शाळाबाह्य मुले शोधून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गावातील ग्रामसेवक सहकार्य करणार आहेत. शिक्षकांनी जिथे आम्हाला मदत मागितली तिथे आम्ही मदत करतोच आणि करणारही आहोत, असे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी म्हटले आहे.