वणव्यांवर वेळीच आणणार नियंत्रण
By Admin | Updated: March 11, 2015 01:22 IST2015-03-11T01:22:50+5:302015-03-11T01:22:50+5:30
उन्हाळ्यात वनांत आग लागण्याचे प्रकार अधिक घडतात. वणव्याचे कारण नैसर्गिक कमी, मात्र मानवी कृतीच अधिक कारणीभूत असल्याचे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

वणव्यांवर वेळीच आणणार नियंत्रण
लोकमत विशेष
देवानंद शहारे गोंदिया
उन्हाळ्यात वनांत आग लागण्याचे प्रकार अधिक घडतात. वणव्याचे कारण नैसर्गिक कमी, मात्र मानवी कृतीच अधिक कारणीभूत असल्याचे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वनातील अग्निमुळे जीवंत वृक्षांचा कोळसा होतो. शिवाय वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येतो. या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन आणि वन्यजीव विभाग आता सज्ज झाला असून, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पासाठी आग विझविणारी ५१ यंत्रे उपलब्ध झाली आहेत.
वनांत आगीने पेट घेताच सर्व्हे आॅफ इंडियाकडून अलर्ट सॅटेलाईटने मॉनिटरिंग होते व त्याद्वारे माहिती मिळते. शिवाय वायरलेस यंत्रणा २४ तास सुरू राहते. २८ आग निरीक्षण करणारे मनोरे उभारण्यात आली असून त्यावर २४ तास वॉकीटॉकीसह निरीक्षण करणारी माणसे उपलब्ध आहेत. त्यामुळे वनांत आग लागल्याची माहिती त्वरित दिली जाते. गाईड्सकडूनही तशी माहिती दिली जाते. या प्रकारात वनाच्या आतपेक्षा बाहेरील आगच अधिक असते. यानंतर संबंधित विभागाकडून उपलब्ध असलेल्या आग विझविणाऱ्या मशिन्सद्वारे वनवा आटोक्यात आणला जातो.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पासाठी आग विझविणारी एकूण ५१ यंत्र सध्यस्थितीत उपलब्ध आहेत. यात नागझिरा अभयारण्यासाठी नऊ यंत्रे, उमरझरी येथे सहा यंत्रे, डोंगरगाव येथे सहा यंत्रे, पिटेझरी येथे सहा यंत्रे, नवेगावबांध पार्क येथे नऊ यंत्रे, कोका अभयारण्यासाठी आठ यंत्रे, कोकाच्या फिरत्या पथकासाठी एक व गोंदियाच्या फिरत्या पथकासाठी एक अशा ५१ यंत्रांचा समावेश आहे.
वणवे आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाने काही साधन सामग्री तयार ठेवली आहे. त्यात फायर ब्लोवर्स ४५, मोबाईल (स्मार्ट फोन/पीडीए ५, प्रोटेक्शन हट्स ५४, वॉच टॉवर्स (निरीक्षण मनोरे) २६, कॉटन डागरी ८५, कॉटन हँड ग्लोज ८५, जंगल शूज ४५, फायर फायटिंग टूल ३०, वॉकीटॉकी ४६, वायरलेस स्टेशन १७ आदींचा समावेश आहे.