धान रोपवाटिकेमध्येच करा खोडकिडीचे नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:00:45+5:30
धान खोड किडीचे सुरवातीच्या टप्प्यात नियंत्रण होऊन रोवणीनंतर होणारे नुकसान टाळता येणे शक्य आहे. या किडीचा प्रौढ पतंग १ ते २ सेंटिमीटर आकाराचा असून पिवळसर रंगाचा असतो. मादी पतंगाच्या दोन्ही पंखावर खालील बाजूस काळसर ठिपका असतो तर नर पतंगाच्या पंखावर ठिपका नसतो. सध्याच्या काळात मादी पतंग पानाच्या शेंड्यावर ५० ते ६० अंडी घालून त्यावर केसांचे आच्छादन टाकून झाकून घेते. एक मादी ३ ते ४ ठिकाणी अंडी घालते.

धान रोपवाटिकेमध्येच करा खोडकिडीचे नियंत्रण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : धानाच्या कमी उत्पादनास विविध किडरोग हे एक मुख्य कारण आहे. जिल्ह्यात धानपिका शिवाय दुसºया पिकांची फेरपालट जास्त प्रमाणात होत नाही. तसेच मागील वर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाचे क्षेत्र असल्याने व यावर्षी वेळेत पावसाला सुरुवात झाल्याने खोडकिडीस पोषक वातावरण तयार झाले आहे.
त्यामुळे धानाच्या रोपवाटिकेमध्येच खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकात्मिक व्यवस्थापनाद्वारे रोपवाटिकेत खोडकिडीचे नियंत्रण करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.त्यामुळे धान खोड किडीचे सुरवातीच्या टप्प्यात नियंत्रण होऊन रोवणीनंतर होणारे नुकसान टाळता येणे शक्य आहे. या किडीचा प्रौढ पतंग १ ते २ सेंटिमीटर आकाराचा असून पिवळसर रंगाचा असतो. मादी पतंगाच्या दोन्ही पंखावर खालील बाजूस काळसर ठिपका असतो तर नर पतंगाच्या पंखावर ठिपका नसतो. सध्याच्या काळात मादी पतंग पानाच्या शेंड्यावर ५० ते ६० अंडी घालून त्यावर केसांचे आच्छादन टाकून झाकून घेते. एक मादी ३ ते ४ ठिकाणी अंडी घालते. ५ ते ८ दिवसात अंड्यामधून अळ्याबाहेर येऊन खोडात प्रवेश करतात व आतील भाग पोखरु न खातात. यामुळे गाभा मर होऊन कीडग्रस्त फुटवे निघतात. तर दाणे भरण्याच्यावेळी पांढऱ्या लोंबी निघतात.
रोपवाटिकेत तसेच रोवणीपूर्वी रोपांच्या शेंड्यावरील अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत. पाच टक्के निंबोळी अर्काची दहा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. शेतात प्रकाश सापळ्यांचा वापर करून पतंगांचा नायनाट करावा. रोपांची मुळे रोवणीपूर्वी क्लोरोपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) १ मिली प्रती लिटर पाणी याप्रमाणे तयार द्रावणात १२ तास बुडवून ठेवावीत.
या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी कामगंध सापळे प्रती एकरी ४ ते ८ याप्रमाणे शेतात लावून नर पतंगांचा नायनाट करता येतो. रोपवाटिकेमध्ये आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास दाणेदार १० टक्के फोरेट १० किलो किंवा ५ टक्के क्वीनॉलफॉस किंवा कार्बोफुरॉन शेतात पुरेसा ओलावा असताना टाकावे. उपलब्ध असल्यास ट्रायकोग्रामा जपोनीकम या परोपजीवी किटकाची प्रती हेक्टरी ५०,००० अंडी याप्रमाणात ८ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा सोडावेत.
या उपायांचा वापर करून शेतकऱ्यांनी खोड किडीचे नियंत्रण करावे. शेतात खोडिकडीचा प्रादुर्भाव आढळल्यास आपल्या कृषी सहाय्यकाशी संपर्ककरून त्यांच्या मार्गदर्शनात उपाययोजना कराव्यात.