‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन हैं, आदेश का पता नही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:29 IST2021-04-07T04:29:56+5:302021-04-07T04:29:56+5:30

गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ५ एप्रिलपासून नवीन निर्बंध लागू केले. यातंर्गत जीवनावश्यक वस्तूंची सेवा वगळता इतर ...

‘Confusion is confusion, order is not known’ | ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन हैं, आदेश का पता नही’

‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन हैं, आदेश का पता नही’

गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ५ एप्रिलपासून नवीन निर्बंध लागू केले. यातंर्गत जीवनावश्यक वस्तूंची सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातील आदेश सोमवारी (दि.५) रात्री उशिरा काढले. परिणामी नवीन निर्बंधांची माहिती शहरातील व्यावसायिकांना नसल्याने त्यांनी सकाळीच दुकाने उघडून नेहमीप्रमाणेे आपल्या कामाला सुरुवात केली; पण त्यानंतर दुकाने बंद करण्याच्या आदेशाची चर्चा सुरू झाली. एकंदरीत सर्वच व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला आणि ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन हैं, आदेश का पता नही’ असे चित्र आहे.

राज्य शासनाने ५ एप्रिलपासून नवीन निर्बंध लागू करण्याची घोषणा केली. शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांनासुद्धा केवळ शनिवार आणि रविवारीच लॉकडाऊन असल्याचा समज होता, तर सोमवारी रात्री उशिरापर्यंत शासनाच्या नवीन निर्बंधांची कल्पना नव्हती. जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्री उशिरा आदेश काढले. त्यामुळे बऱ्याच जणांना मंगळवारपासून जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार असल्याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे हॉटेल, रेस्टाॅरंट आणि चहाटपरी, पोहा विक्रेते यांनी सकाळीच आपली दुकाने उघडली, तर सकाळी ९ वाजता शहरातील बाजरपेठ उघडण्यास सुरुवात झाली. याचदरम्यान व्यापाऱ्यांमध्ये दुकाने सुरू की बंद ठेवण्यावर संभ्रम निर्माण झाला. यामुळे बाजारपेठेतील विक्रेते एकत्र येऊन यावर मंथन करू लागले. याचदरम्यान जिल्हा प्रशासनाने काढलेला आदेश व्हॉटस्‌ॲपवर व्हायरल झाला. त्यामुळे अजून कन्फ्यूजन वाढले. यातच दुपारी १ वाजला. त्यानंतर पोलिसांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली; पण या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनावर रोष व्यक्त केला.

...........

आधीच आदेश का काढले नाहीत

शहरातील अनेक छोटे-मोठे विक्रेते नेहमीप्रमाणेच आपली दुकाने उघडण्यासाठी दुकानात पोहोचले. त्यांच्या दुकानांत काम करणारा नोकर वर्गदेखील सकाळीच पोहोचला; पण त्यांना नवीन निर्बंधांनुसार ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद राहणार असल्याची कुठलीच कल्पना नव्हती. यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला, तर बाहेरील गावावरून येणाऱ्या नागरिकांनासुद्धा फटका बसला.

.....

तुम्हीच सांगा आम्ही जगायचे कसे

कोरोनामुळे मागील दोन महिन्यांपासून व्यवसायाची गाडी थोडी रुळावर आली होती; पण आता नव्या निर्बंधांमुळे महिनाभर दुकाने बंद ठेवावी लागणार असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, उधारी कशी फेडायची, असा सवाल शहरातील चहाटपरी चालक टेकचंद रिनायत, देवचंद सोनवाने, दिलीप सोनुले यांनी उपस्थित केला.

..............

मजुरांना आल्या पावलीच परतावे लागले

गोंदिया येथील विविध दुकानांत आणि कामासाठी लगतच्या आठ-दहा गावांतील मजूर वर्ग येतो. त्यांच्या ड्यूटीच्या वेळेप्रमाणे ते सकाळीच आपापल्या ड्यूटीवर परतले. मात्र, त्यांना दुकाने बंद राहणार असल्याने आल्या पावलीच परत जावे लागले. यामुळे श्रम आणि मजुरी दोन्ही बुडाले.

...............

प्रशासनाने व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले नाही

कोरोना संक्रमण काळात शासनाने जे जे निर्बंध लागू केले त्यास व्यापाऱ्यांनी नेहमीच सहकार्य केेले; पण शासनाने नवीन निर्बंध लागू करताना व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. जो नियम जीवनावश्यक वस्तू आणि सेवांसाठी लागू केला आहे, तोच नियम इतर व्यावसायिकांना लागू करून दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

.........

शासनाने ऑनलाइन व्यापाराला परवानगी दिली आहे, तर दुसरीकडे नवीन निर्बंध लावून व्यवसायावर संकट निर्माण केले आहे. शासनाने दुकाने बंद ठेवण्याचा आदेश रद्द करून कडक निर्बंध लागू करावेत.

- लक्ष्मीचंद रोचवानी, सचिवा गोंदिया जिल्हा व्यापारी फेडरेशन.

..........

शासनाने नवीन निर्बंध लावताना व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतला. आमचा या निर्णयाला पूर्णपणे विरोध आहे. यामुळे व्यापारसुद्धा डबघाईस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे निर्बंध शिथिल करावेत.

- संगम कुंगवानी, अध्यक्ष कपडा असोसिएशन.

.......

नवीन निर्बंध लागू करण्यापूर्वी व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. ऐन लग्नसराईच्या कालावधीत दुकाने बंद ठेवावी लागणार असल्याने व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे या निर्णयाला आमचा विरोध आहे.

- राजकुमार तिवारी, अध्यक्ष बर्तन असोसिएशन.

....

कोरोनामुळे मागील वर्षीपासून व्यापारी, उद्याेजक, कामगार, शेतकरी हे सर्वच संकटात आहेत. अशा स्थितीत पुन्हा महिनाभर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा हे सर्व संकटात आले आहेत. त्यामुळे अशा स्थितीत शासनाने घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे.

- संजय टेंभरे, अध्यक्ष भाजप किसान आघाडी.

Web Title: ‘Confusion is confusion, order is not known’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.