गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. निवडणुकांनंतर विजयी, तसेच पराभव झालेल्या सर्वच उमेदवारांना निवडणुकीचा खर्च सादर करावा लागणार आहे. त्यामुळे आता सर्वच उमेदवारांची निवडणुकीचा खर्च सादर करण्याची लगबग सुरू आहे. निवडणूक खर्च सादर करण्यासाठी उमेदवारांची पायपीट टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने ऑनलाइन खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, बऱ्याच उमेदवारांना याची माहितीच नाही, तर अनेक उमेदवारांना ऑनलाइन खर्च सादर करण्याची प्रक्रिया किचकट वाटत असल्याने, अनेक उमेदवारांनी सोमवारपासून ऑफलाइनच खर्च सादर करणार असल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या १,६९३ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक रिंगणात एकूण ३,१५१ उमेदवार होते. या सर्वच उमेदवारांना निवडणुकीनंतर महिनाभराच्या आत खर्च सादर करावा लागतो. निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते, तसेच पुढील ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहता येत नाही. त्यामुळे सध्या सर्वच उमेदवारांची निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. निवडणूक आयोगाने यंदा ऑनलाइन खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असली, तरी अनेक उमेदवारांना या प्रक्रियेची माहिती नसल्याची बाब पुढे आली. अनेक उमेदवारांनी सोमवारी तहसील कार्यालयात जाऊन निवडणूक खर्च सादर करणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
......
ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन खर्च सादर करण्याकडे कल
ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी उमेदवारांना तहसील कार्यालयात पायपीट करावी लागू नये, ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, यासाठी ऑनलाइन खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, पण ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे ऑनलाइन खर्च सादर करण्यासाठी लिंक बरोबर राहत नसल्याने, अनेक उमेदवारांनी ऑफलाइन खर्च सादर करण्याला प्राधान्य दिले आहे.
........
खर्च सादर करण्यासाठी आता बिलांची जुळावाजुळव
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता उमेदवारांना निवडणुकीदरम्यान झालेल्या खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगाच्या मर्यादेत सादर करण्यासाठी बिलांची जुळवाजुळव करण्यासाठी लगबग सुरू आहे. निवडणुकीचा खर्च हा तारीखनिहाय सादर करायचा असून, जी बिले जोडली जाणार आहेत, तीही खात्रीपूर्वक जोडावी लागणार आहेत. त्यामुळे सध्या उमेदवार याच प्रक्रियेत गुंतले आहेत.
.........
निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या : १८९
ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेले सदस्य : १,६९३
.............
कोट :
ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर ऑनलाइन सादर करण्याची माहिती नाही. मात्र, आपण सोमवारी तहसील कार्यालयात जाऊन ऑफलाइनच खर्च सादर करणार आहे.
- जितेंद्र कटरे, सदस्य
.....
आमच्या गावाकडे मोबाइल नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे ऑनलाइन खर्च सादर करताना नेटवर्कची अडचण येते. ही प्रक्रियाही किचकट आहे. त्यामुळे मी ऑफलाइनच खर्च सादर करणार आहे.
- मनोज बोपचे, सदस्य